मुख्यमंत्री महोदय…आपल्याला पुन्हा एकत्र यावे लागेल…

0
220

– अजित पवार यांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप किंवा दावे-प्रतिदाव्यांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी सरकारने शेतकऱ्यांना नियमांच्या पलीकडे जाऊन मदत करायला हवी, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. दरम्यान, यावेळी सत्ताधाऱ्यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांना दिलेल्या मदतनिधीच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक शब्दांत टोला लगावला.

नेमकं झालं काय?
राज्य सरकारकडून पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या निधीमध्ये भाजपाच्या आमदारांच्या मतदारसंघात जास्त निधी जाहीर झाला असून शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांसाठी कमी मदतनिधी जाहीर झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, असं असताना आधीच्या सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना देखील स्थगिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. तसेच, देण्यात येणाऱ्या निधीबाबत देखील अजित पवारांनी खोचक टीका केली.

सरकारने निधीवाटपामध्ये दुजाभाव करू नये, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे. “मुख्यमंत्री महोदय, आपण आत्ताच्या पुरवणी मागण्यांमध्ये आपल्या ४० आमदारांना ५० कोटींची कामं दिली आहेत. शिंदे गट, तुमचा गट, तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा. भाजपानं देखील आपल्या आमदारांसाठी ५०-५० कोटींची कामं घेतली. पण असा दुजाभाव करू नका. कारण जिथं नुकसान व्हायचं तिथे ते झालंच आहे. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान मतदारसंघ बघून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचा मतदारसंघ असं काही नुकसान झालेलं नाही. सगळीकडेच नुकसान झालं आहे. त्यामुळे मदतनिधी देताना थोडं खुलं धोरण ठेवावं लागेल”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांनी मिश्किल शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावताना सूचक विधान केलं आहे. “आपण मंत्रीमंडळात एकत्र असताना जी कामं आपण केली, त्याला तुम्ही आता स्थगिती देणं हे वागणं बरं नव्हं. कधी कुणावर काय प्रसंग येईल हे सांगता येत नाही. सगळे दिवस सारखे नसतात. कधी आपल्याला पुन्हा एकत्र यावं लागेल, सांगता येत नाही. त्यामुळे असं करू नका”, असं अजित पवार म्हणाले.