पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – गरजू महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना सन्मानाने रोजगार उपलब्ध करून देण्याचा महापालिका प्रयत्न करत आहे. या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कापडी पिशव्या तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण लोकाभिमुख उपक्रमातून या महिलांच्या हातून एकप्रकारे पर्यावरण आणि समाजाची सेवा घडणार आहे, असे उद्गार मावळते महापालिका राजेश पाटील यांनी काढले.
प्लास्टिकमुक्त शहर बनविण्यासाठी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्या वापरण्याचे पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. कापडी पिशव्या तयार करण्यासाठी कोरोनाने निधन पावलेल्या शहरातील व्यक्तींच्या गरजू पत्नींना काम देण्यात आले आहे. त्यासाठी ‘नवी दिशा शिलाई युनिट’ची स्थापन करण्यात आली. या युनिटचे उद्घाटन महापालिका आयुक्त पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपआयुक अजय चारठाणकर, चंद्रकांत इंदलकर, ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी विनोद जळक, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांच्यासह बचतगटांच्या महिला आणि नागरिक उपस्थित होते.
आयुक्त पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ आणि सुंदर शहर करत असताना प्लास्टिक पिशवीच्या वापरावर बंदी असून यासाठी पर्याय देणे गरजेचे आहे. या अनुषंगाने नागरिकांनी कापडी पिशवीचा अधिकाधिक वापर करावा यासाठी महापालिका स्तरावर जागृती करण्यात येत आहे. शिवाय महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी कापडी पिशव्यांचे वाटपदेखील करण्यात आले. नागरिकांना सहजतेने कापडी पिशव्यांची उपलब्धता व्हावी यासाठी त्या तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने ‘नवी दिशा शिलाई युनिट’ स्थापन करण्यात आले आहे. हा लोकाभिमुख उपक्रम असून यातून रोजगार निर्मिती व्हावी तसेच नागरिकांना कापडी पिशव्या सहजतेने आणि किफायतशीर दरांत उपलब्ध व्हाव्यात हा उद्देश आहे.
कोरोनामध्ये निधन पावलेल्या व्यक्तींच्या पत्नींना कापडी पिशव्या तयार करण्याचे काम देण्यात आहे. युनिटच्या उद्घाटनाचा हा क्षण भावूक जरी असला तरी अशा समस्याग्रस्त महिलांचे सक्षमीकरण करणे महत्त्वाचे आहे. बचत गटांना रोजगाराची संधी देणे आणि नवीन काम करण्यासाठी विश्वास देणे गरजेचे असते. क्षमता, अनुभव, पाठबळ आणि योग्य प्रशिक्षणाच्या बळावर बचत गट अधिक सक्षम होत असतात. महापालिकेच्या वतीने महिलांना अनेक व्यवसायभिमुख प्रशिक्षणदेखील देण्यात येत आहे. नवी दिशा उपक्रमाद्वारे तीन बचतगटांना सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीचे काम दिले जात आहे, ही सकारात्मक बाब आहे. यामाध्यमातून त्यांच्या हातून लोकसेवा घडत असून समाजकार्य देखील साध्य होत आहे, असे मत आयुक्त पाटील यांनी मांडले.
महापालिकेच्या वतीने ‘नवी दिशा’ हा उपक्रम सुरु करण्यात आला असून त्याद्वारे सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी महिला बचत गटांना विविध काम देण्यात येत आहे. यामुळे बचत गटांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध होत आहे. या गटांना महापालिका क्षेत्रातील सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीचे काम दिले जात आहे. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तीन बचत गटांना असे काम देण्यात आले. या कामाचा कार्यादेश आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते संबंधित बचत गटांना यावेळी देण्यात आला. यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई बचतगट, सिद्धी महिला बचतगट, भरारी महिला बचतगट या तीन बचतगटांचा समावेश आहे.
यावेळी बचत गटाच्या प्रतिनिधी सुवर्णा भालेराव, आशा रणखांबे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय अधिकारी विनोद जळक यांनी केले तर आभार समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांनी मानले. सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.