मोहित कंबोज कुठल्या आधारावर बोलला ? रुपाली पाटलांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

0
216

Pune, (Being Pimprichinchwadkar ) : मोहित कंबोज हा परप्रांतीय असून तो आमच्या राज्यात येऊन सातत्याने विरोधकांना धमक्या देत आहे. पण आम्ही लक्ष देत नाही. कारण असे फालतू मोहित कंबोज वारंवार भुंकताना दिसत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. मोहित कंबोज यांनी काल ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नेता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला तुरुंगात जाईल, असे विधान केले होते. त्यानंतर राज्यातले राजकारण अधिकच तापताना पाहायला मिळत आहे. त्याचवरून मोहित कंबोज यांच्यावर टीका करताना रूपाली ठोंबरे पाटील यांनी राज्य सरकारलादेखील घेरले आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

भाजपाचे नेत्यांनी हा जो पोरखेळ लावला आहे तो बंद करावा, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, असा इशारादेखील राज्य सरकारला रूपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे. भाजपाचा कुठलाही नेता उठतो आणि म्हणतो, हा नेता आत जाणार, याच्यावर कारवाई होणार. याला कोणताही कायदेशीर थारा नाही. भाजपाच्या नेत्यांकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर करून ज्याला क्लिनचीट दिली असेल, तुमच्या काळात दिली गेली असेल तरी पुन्हा चौकशी करायला लावणे हा पोरखेळ आहे. हा पोरखेळ तुम्ही थांबवणार आहात का, असा सवाल त्यांनी भाजपाला केला आहे.