दोषींची सुटका झाल्याचे कळताच बिल्किसच्या अश्रुंचा बांध फुटला आणि ती काही काळ सुन्न झाली

0
348

अहमदाबाद, दि. १७ (पीसीबी) – गुजरातमध्ये झालेल्या दंगलींमध्ये बिल्किस बानो या गर्भवती महिलेवर बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात जणांची दंगलखोरांनी हत्या केली होती. याप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांची सोमवारी गोध्रा कारागृहातून मुक्तता करण्यात आली. या बातमीमुळे बिल्किस बानोला प्रचंड धक्का पोहोचल्याचे पती याकूब रसूल यांनी माध्यमांना सांगितले. दोषींची सुटका झाल्याचे कळताच बिल्किसच्या अश्रुंचा बांध फुटला आणि ती काही काळ सुन्न झाली होती, अशी माहिती रसूल यांनी दिली आहे.

बिल्किस बानोप्रकरणी ११ जणांची मुक्तता धक्कादायक; पीडितेच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
या घटनेनंतर ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने बिल्किस यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. “माझी मुलगी सालेहाच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी मी प्रार्थना करतेय. मला एकटं सोडा” अशी प्रतिक्रिया बिल्किस यांनी दिली. २००८ पासून सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात ११ दोषी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. या दोषींची न्यायालयाने मुक्तता केली. या निर्णयाचा आम्हाला धक्का पोहोचला असून आम्ही हादरलो आहोत, अशी भावना रसूल यांनी व्यक्त केली. २००२ च्या गुजरात दंगलीमध्ये बिल्कीस बानोवर सामुहिक बलात्कारानंतर दोषींनी तिच्या तीन वर्षीय मुलीची देखील हत्या केली होती.

“जी लढाई आम्ही वर्षानुवर्ष लढलो ती एका क्षणात संपवण्यात आली. दोषींना न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला अशा पद्धतीने कमी करण्यात आले. आम्ही माफी हा शब्द कधीच ऐकला नव्हता. अशाप्रकारची पद्धत अस्तित्वात असते हे देखील आम्हाला ठाऊक नव्हते” अशी उद्विग्न प्रतिक्रिया रसूल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी फोनवरून संवाद साधताना दिली. दोषींची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना हार घालून, मिठाई भरवून स्वागत करण्यात आले. हे पाहून बिल्किस नि:शब्द होती. व्यथित आणि उदास होती, असे रसूल म्हणाले.

आम्हाला दोषींची मुक्तता झाल्याचे कळेस्तोवर ते त्यांच्या घरी देखील पोहोचले होते. या दोषींनी याआधीही अनेकदा पॅरोल घेतली होती. मात्र, त्यांची आता अशाप्रकारे सुटका होईल, असा आम्ही विचार देखील केला नव्हता, असे रसूल यांनी सांगितले. “२००२ मध्ये झालेली घटना अतिशय भयानक होती. दोषींच्या मुक्तेतनंतर बिल्किसच्या मनात काय सुरू असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो. तिच्यावर अतोनात अत्याचार करण्यात आले. स्वत:च्या मुलीची हत्या तिने पाहिली. एक महिला म्हणूनच नाही तर एका आईचाही दोषींनी अपमान केला” असा संताप रसूल यांनी यावेळी व्यक्त केला. आता आम्हाला एकटे राहायचे आहे. आमच्या पाच मुलांचे संगोपन करायचे आहे. आम्हाला आमच्या सुरक्षिततेची काळजी आहे. मात्र, आता पुढच्या हालचालींचा विचार करायला आमच्याकडे वेळ नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया रसूल यांनी दिली.