साईरंग डेव्हलपर्सच्या संचालकांना कोठडी

0
616

पुणे, ता. १३ : बंगलो आणि फार्म हाऊससाठी प्लॉट देण्याच्या बहाण्याने सुमारे ४५० गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी साईरंग डेव्हलपर्स प्रा. लि. च्या कार्यकारी संचालक महिलेला न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी हा आदेश दिला.

नंदिनी कोंढाळकर असे या कार्यकारी संचालक महिलेचे नाव आहे. या गुन्‍ह्यात तिला हिंजवडी पोलिसांनी गुरुवारी (ता. ११) अटक केली होती. या गुन्ह्यात यापूर्वी साईरंग डेव्हलपर्स प्रा. लि. च्या संचालक किझुक्कुम परमबील मलिक ऊर्फ के. आर. मलिक (वय ५६, रा. बाणेर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. याबाबत संतोष नाटेकर (वय ६३, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर उदय बक्षी आणि अतुल गोडसे यांनीदेखील तक्रार दिली आहे. १० फेब्रुवारी २०१२ पासून एक मार्च २०२१ या कालावधीत साईरंग डेव्हलपर्स आणि प्रमोटर प्रा. लिमिटेड हिंजवडी फेज दोन येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी मलिक याच्यासह शाहरुख मलिक, नंदिनी कोंढाळकर, पीटर आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपासासाठी आरोपींची पोलिस कोठडीत चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोंढाळकर हिला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी केली. कोंढाळकर हीच्यावतीने ॲड. ऋषिकेश सुभेदार आणि ॲड. अमोल डांगे कामकाज पाहत आहे.