पुणे-नाशिक महामार्गावरील धोकादायक झाडे तातडीने काढा

0
229

दुर्घटना घडल्यास सर्वस्वी महापालिकेची जबाबदारी राहील
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीकडे जाणा-या महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुबाभळीची आणि इतर झाडे धोकादायक स्थितीत वाढली आहेत. याकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष आहे. ही धोकादायक झाडे तातडीने काढावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महापालिकेकडे केली आहे. झाडे वेळेत न काढल्यास आणि काही दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची राहील असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात शहराध्यक्ष गव्हाणे यांनी म्हटले आहे की, चाकणकडून शिवाजीनगर पुण्याकडे जात असताना नाशिक फाटा येथे निलेश शिंगाळे व समाधान पाटील हे दोन युवक दुचाकीवरुन जात होते. अचानक त्यांच्या दुचाकीवर झाड पडले. त्यात या दोन निष्पाप युवकांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर नाशिककडे जाणा-या वाहनाबरोबरच भोसरी, चाकण, पुणे मार्गाकडे जाणारा कामगार वर्ग मोठा आहे. भविष्यात अशी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत समन्वय साधून या रस्त्यावरील धोकादायक झाडे महापालिकेमार्फत काढण्याचे आदेश देण्यात यावेत. अन्यथा भविष्यात अशी दुर्घटना घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही महापालिकेची राहील. धोकादायक झाडे न तोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीव्र आंदोलन करण्यात येईल.

पावसाळ्यापूर्वीच धोकादायक झाडे का तोडली नाहीत?
पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी धोकादायक झाडे तोडणे आवश्यक आहे. झाडांच्या फाद्यांची छटाई केली पाहिजे. परंतु, यंदा पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे तोडल्याचे दिसून येत नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत समन्वय साधून पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीकडे जाणा-या महामार्गावरील झाडे तोडली असती. तर, अशी दुर्घटना घडली नसती, असेही गव्हाणे यांनी म्हटले आहे.