मोठी बातमी – रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवानाच रद्द

0
338

पुणे, दि. ११ (पीसीबी) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यातील अजून एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई केलीय. आरबीआयने रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवानाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं पुण्यातील ‘रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करत 22 सप्टेंबर 2022 पासून बँकिंग कामकाज बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

सन २०१७ च्या हायकोर्टाच्या आदेशानुसार रिझर्व्ह बँकेनं रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं आता सहा आठवड्यांत बॅंकेचे व्यवहार होणार बंद आहेत. बँकेत अनेकांचे पैसे अडकल्याने ठेवीदारांनी दिर्घ काळासाठी लढा दिला होता. पण बँकेच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच लायसन्स रद्द झाल्याने त्यांना धक्का बसला आहे.

दरम्यान रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेचा परवाना रद्द केला, हे फारच दुर्दैवी आणि अनाकलनीय असून गेल्या ३ वर्षात विविध बँकांमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना आम्ही प्रत्यक्ष भेटलो आणि रिझर्व्ह बँकेला अनेक निवेदने दिली, मात्र दुर्दैवाने त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आतासुद्धा आम्ही एक मोठे गुंतवणूकदार मिळवले आहेत, जे बँक घेऊ शकतात, मात्र परवाना रद्द करून रिझर्व्ह बँकेने सर्व प्रयत्नांवर पाणी फिरवले अशा शब्दात रुपी बँक ठेवीदार हक्क समितीचे भालचंद्र कुलकर्णी यांनी या निर्णयावर टीका केली आहे.