नदीसंवर्धनासाठी ‘नदी सुरक्षा पथकाची’ स्थापना; पथकात तृतीयपंथीयांचा समावेश

0
204

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात पर्यावरण आणि नदीसंवर्धनाच्या कामकाजासाठी महापालिकेच्या वतीने तृतीयपंथीयांचा समावेश असलेल्या नदी सुरक्षा पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत महापालिकेच्या वतीने विविध कृतीशील उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या तृतीयपंथी समूहाचे सामाजिक आणि आर्थिक समावेशन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

शहरात अनेक ठिकाणी नदी, नाल्यांच्या काठावर तसेच रस्त्याच्या कडेने खाजगी जागेत जागा मालकांद्वारे अनधिकृतपणे भराव टाकले जात आहेत. तसेच काही ठिकाणी मोकळ्या जागेत देखील भराव टाकल्याचे आढळले आहे. या कृतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच अशा गोष्टींना आळा घालणे व दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आगामी स्वातंत्र्यदिनी आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते “नदी सुरक्षा पथकाच्या” कार्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या पथकाच्या तीन तुकड्या निर्माण करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आयोजित करण्यात आला आहे