सोमय्या पिता पुत्राला उच्च न्यायालयाचा दिलासा

0
336

मुंबई, दि. १० (पीसीबी) : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला आहे. INS Vikrant घोटाळा प्रकरणी या पितापुत्रांना अटकपूर्व जामीन कोर्टानं बुधवारी मंजूर केला. सोमय्यांविरोधात अद्याप कोणताही पुरावा आढळून आलेला नाही, असं मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलं.

घोटाळ्यात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी INS Vikrantच्या निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी राऊत यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. याप्रकरणी अटकेची भीती असल्यानं सोमय्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या माहितीनंतर कोर्टानं नील आणि किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

यापूर्वी २० एप्रिल रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह मुलगा नील सोमय्या यांना मुंबई हायकोर्टानं अटकेपासून अंतरिम दिलासा दिला होता. आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी आरोपांसंदर्भात तुर्तास कुठलीही कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टानं दिले होते.

आयएनएस विक्रांत निधीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला होता. किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतसाठी मुंबईत निधी गोळा केला होता. हा निधी राजभवानाकडे सुपूर्द करणे गरजेचे होते. पण, सोमय्यांनी निधी राजभवनाला दिला नाही. त्याबाबतच पत्र राजभवनाकडून प्राप्त झालं आहे.

संजय राऊतांच्या आरोपानंतर किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना अटक होण्याची शक्यता होती. मुंबई पोलिस दोघांचाही शोध घेत होते. मात्र, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पहिल्यांदा सत्र न्यायालयाने पिता-पुत्रांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर सोमय्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्यांना अटकेपासून दिलासा दिला होता.