महाराष्ट्रात भाजपला धोका दिल्याने शिवसेना फोडली, मोदींचा गौप्यस्फोट

0
311

मुंबई, दि. १० (पीसीबी) : साधारण दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेत मोठं बंड झालं. त्यानंतर बंडखोर आमदारांनी भाजपच्या मदतीने राज्यात नवं सरकार स्थापन केलं. पण या सगळ्यात भाजप आतापर्यंत असा दावा करत होती की, शिवसेनेत बंडखोरी ही त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे झाली. शिवसेना फोडण्यात भाजपचा अजिबात हात नव्हता. मात्र, आता पहिल्यांदा भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने शिवसेना भाजपनेच फोडल्याचे मान्य केलं आहे.

त्याचं झालं असं की, काल (९ ऑगस्ट) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत राजदशी हातमिळवणी केली. त्यामुळे बिहारमधून भाजपला सत्तेतून बाहेर पडावं लागलं. नितीश कुमारांच्या याच खेळीमुळे भाजप नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे खूपच चिडले आहेत. याचबाबत बोलताना सुशील मोदी यांनी मोदी यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. जो महाराष्ट्रासाठी संबंधित आहे.

महाराष्ट्रात भाजपला धोका दिल्याने शिवसेना फोडली असा गौप्यस्फोट सुशील मोदी यांनी यावेळी केला आहे. शिवसेना भाजपनंच फोडल्याचं उघड वक्तव्य मोदी यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. भाजपला धोका दिल्याचे परिणाम शिवसेना भोगते आहे. असंही ते यावेळी म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इशारा देताना सुशील मोदी यांनी शिवसेनेसंदर्भात हे वक्तव्य केलं आहे.

सुशील मोदी नेमकं काय म्हणाले –
‘भाजपने आजपर्यंत कधीही आपल्या सहयोगी पक्षाला धोका दिलेला नाही. आम्ही त्याच पक्षाला फोडलं ज्यांनी आम्हाला धोका दिला. मग ते महाराष्ट्रात शिवसेना असो. त्यांची युती होती भाजपसोबत, पण शिवसेनेने जेव्हा धोका दिला तेव्हा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले.’ असा गौप्यस्फोट सुशील मोदी यांनी केला आहे.

‘राजद-जदयूला असा भ्रम आहे की, तिघे एकत्र आल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी हरवू शकतो. ते हे विसरत आहेत की, आज नरेंद्र मोदींची लोकप्रियता २०१४, २०१९ पेक्षा देखील किती तरी पटीने जास्त आहे. त्यामुळे त्यांनी कितीही ताकद लावली तरी 2024 मध्ये ते नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकत नाहीत. तसंच आम्ही बिहारमध्ये प्रचंड बहुमतांनी निवडून येऊ.’ असं म्हणत सुशील मोदींनी नितीश कुमार आणि त्यांच्या पक्षाला एकप्रकारे इशाराच दिला आहे.