दरोड्याच्या तयारीत असलेल्या नेपाळी टोळीला पोलिसांच्या जाळ्यात

2 Min Read

चिंबळी, दि. ९ (पीसीबी) – चिंबळी परिसरातील रेड्डी कस्टम प्रा. लि. कंपनीजमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या नेपाळी टोळीला व त्यांचे दोन अल्पवयीन साथीदारांना आळंदी पोलिसांनी चिंबळी येथून अटक केली आहे. हि कारवाई सोमवारी (दि.8) पहाटे पाचच्या सुमारास करण्यात आली.

नयसिंग लालसिंग ढोली (वय.48) निट बहमसिंग ढमाई (वय 32) विशाल शेटे ढोली (वय 18), दिनेश नयसिंग ढोली (वय19) यांना अटक केली असून दोन अस्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे.हे सर्व मुळचे नेपाळचे असून सध्या लोणी काळभोर येथे राहण्यास आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे हातात कोयता व दरोड्याचे इतर साहित्य घेऊन सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास चिंबळी परीसरातील रेड्डी कस्टम प्रा. लि. कंपनीचे पत्र्याची सुरक्षाभिंत उचकटण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी आवाजाने आसपाच्या नागरिकांनी त्यांना हटकले व तेथून हुसकावून लावले. आरोपींनी तेथून पळ काढला व पुढे त्यांनी दुसऱ्या कंपनीमध्ये चोरी करण्याच प्रयत्न सुरु केला.या दरम्यान नागरिकांनी आळंदी पोलिसांना याची खबर दिली. पोलीस परिसरात पोहचले असता त्यांनी आरोपींना रंगे हाथ पकडले. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी कोयता, 2 हेक्सा ब्लेड,मिरचीपूड,लोखंडी पान्हा,लोखंडी पक्कड,स्क्रू ड्रायव्हर, कटर ब्लेड दोन लॅपटॉप, तांब्याचे केबल असा एकूण 4 ते 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आळंदी पोलिसांनी आज (मंगळवारी) आरोपींना न्यायालयात हजर करणार असून आळंदी पोलीस याचा पुढिल तपास करत आहेत. यावेळी टोळीचा प्रमुख अद्याप फरार असून परिसरात रेकी करून कंपनीमधील तांब्याची केबल चोरून नेणे हा त्यांचा मोडस आहे, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली.

Share This Article