भाजपच्या कारभाराला जनता कंटाळली- विद्या चव्हाण

0
260

पिंपरी दि. ८ (पीसीबी) – विरोधात गेल्यास जाणीवपूर्वक, सूडबुद्धीने कारवाई करणे अशा प्रकारचा कारभार सध्या सुरू आहे. महागाई, बेरोजगारीने उच्चांक गाठला असून याबद्दल बोलायचे नाही. अशा पद्धतीचा हुकूमशाही कारभार पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकाराला जनता कंटाळली असून याचे उत्तर मतदानातून नागरिक भाजपला नक्कीच देतील असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले. आगामी  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने महिला पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मजबूत संघटन देण्याचा पक्का निर्धार केला आहे.  प्रभाग तीन कि चारचा असा संभ्रम निर्माण केला तरी फारसा फरक राष्ट्रवादीला पडणार नाही असेही त्या म्हणाल्या.

पिंपरी चिंचवड शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आढावा बैठकीचे आयोजन मोशी येथे करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीचे नियोजन महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी केले.

 यावेळी प्रदेश निरीक्षक डॉ.आशाताई मिरगे, विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे, पिंपरी चिंचवड माजी निरीक्षक उज्वला शेवाळे, पिंपरी चिंचवड निरीक्षक शितल हगवणे, प्रदेश सरचिटणीस रूपाली दाभाडे, माजी महापौर मोहिनी लांडे, शहराध्यक्ष अजित  गव्हाणे, ज्येष्ठ नेत्या शमीम  पठाण, सुरेखा लांडगे, तसेच आजी-माजी नगरसेविका, सेल अध्यक्ष व तीनही विधानसभा अध्यक्ष,कार्याध्यक्ष,वरिष्ठ कार्याध्यक्ष ,महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये प्रत्येक विधानसभाप्रमाणे प्रत्येक प्रभागाचा आढावा घेण्यात आला.तसेच नवीन महिलांच्या पदनियुक्त्या करण्यात आल्या. या बैठकीला पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदार संघातील महिलांची मोठी उपस्थति होती . 

विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिला पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात मजबूत संघटन देण्याचा प्रयत्न केला आहे.  महिला संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या हातामध्ये या शहराची सत्ता पुन्हा येईल असा विश्वास आम्हाला आहे. आगामी निवडणुकीसाठी तीन सदस्य प्रभाग रचना झालेली असताना जाणीवपूर्वक चार सदस्य प्रभाग करण्याचा अट्टाहास केला जात आहे.  यातून संभ्रम निर्माण केला जात आहे . मात्र याचा राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा फरक पडणार नाही असे चव्हाण यावेळी म्हणाल्या.

भाजपवर जोरदार हल्लाबोल

सध्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांवर ज्याप्रकारे ईडीच्या माध्यमातून कारवाया सुरू आहेत त्यावर विद्या चव्हाण यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात त्यावेळी या आरोपांची रीतसर न्यायालयामध्ये चौकशी केली जाते. त्यानंतर ते आरोप सिद्ध व्हावे लागतात.  मात्र सध्या केवळ सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही अशा राज्यांमध्येच ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जाते आणि नेत्यांना जेलमध्ये टाकण्यात येते.  असे चित्र सध्या संपूर्ण राज्यात आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आहेत.भाजपच्या विरोधात बोलायचे नाही.  आंदोलने,  मोर्चे करायचे नाहीत.  जे कोणी असे विरोधात बोलेल त्या विरोधात कारवाई करायची .एकंदरीत असा प्रकार सुरू आहे ,मात्र हे जास्त दिवस टिकून राहणार नाही.  भाजपच्या या कारभाराला जनता कंटाळली आहे असे देखील विद्या चव्हाण यावेळी म्हणाल्या.

शहराध्यक्ष कविता आल्हाट यावेळी म्हणाल्या शहरातील 46 प्रभागांमध्ये महिला कार्यकारणीच्या माध्यमातून बुथ  कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत.  प्रत्येक प्रभागात आढावा घेण्यात आला असून  महिला विंगच्या माध्यमातून काम सुरू आहे.  राष्ट्रवादी पक्षाची ध्येयधोरणे नागरिकांपर्यंत पोचवण्यात आली आहेत.  ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो तिथे नागरिकांच्या मनात महागाई, बेरोजगारी यामुळे मोठा आक्रोश असल्याचे दिसून आले आहे.  त्यामुळे मतदानाच्या माध्यमातून जनता त्यांचा संताप,  आक्रोश दाखवून देतील. आगामी निवडणुकीत  ‘सौ की पार’ चा  असा आमचा संकल्प आहे असेही आल्हाट यांनी नमूद केले.