आवडीचे क्षेत्र आणि अफाट कष्ट हाच यशाचा मार्ग !

0
396

पिंपरी, दि.८(पीसीबी) – “आवडीचे क्षेत्र आणि अफाट कष्ट हाच यशाचा मार्ग होय!” असा कानमंत्र सजग नागरिक मंचाचे संस्थापक-अध्यक्ष आणि ज्येष्ठ समुपदेशक विवेक वेलणकर यांनी इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक ०७ ऑगस्ट २०२२ रोजी दिला. माजी नगरसेविका शर्मिला बाबर, विद्यानंद भवनच्या मुख्याध्यापिका संजना सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते अनुप मोरे, राजेंद्र बाबर, चंद्रकांत धर्माधिकारी, बाळासाहेब भिंगारकर, बाबूराव फडतरे, मंडल अध्यक्ष विजय शिनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शर्मिला बाबर यांनी आपल्या मनोगतातून, “करिअर आपोआप घडत नाही; तर त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते.

केवळ पैसा मिळविणे हा एकमेव उद्देश डोळ्यांपुढे ठेवून करिअर निवडण्यापेक्षा आपला स्वाभाविक कल ओळखून आणि सर्वस्व पणाला लावून काम करीत राहिल्यास यश, आनंद, समाधान आणि नावलौकिक प्राप्त होईल!” असे विचार मांडले. याप्रसंगी प्रभाग क्रमांक पंधरामधील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. विद्यार्थी आणि पालकांनी प्रातिनिधिक मनोगतांतून यशामागील रहस्य, भावी काळातील संकल्प आणि कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थी आणि पालक यांना करिअर मार्गदर्शन करताना विवेक वेलणकर म्हणाले की, “दहावीला जरी उत्तम गुण मिळाले तरी ते आता विसरून जा; कारण भरघोस गुण मिळाले म्हणजे सर्व काही मिळाले असे नाही. पालक, मित्रमंडळी, नातेवाईक यांचे सल्ले जरूर घ्या; पण आपल्याला मनापासून कोणते विषय आवडतात; यांवर पुढील शिक्षणाची दिशा ठरवा. आवड नसतानाही ठरावीक विषयांना सर्वोच्च प्राधान्य देणे चुकीचे आहे.

असंख्य क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध आहेत. विधी (कायदा), अर्थशास्त्र, चित्रकला, सनदी लेखापाल, व्यवस्थापनशास्त्र, भाषविज्ञान, स्पर्धा परीक्षा यासारख्या अनेक अभ्यासक्रमांना दहावी, बारावीनंतर प्रवेश घेता येतो. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यावर आपले क्षेत्र निश्चित करा. पदवीधर होईपर्यंत निवडलेल्या क्षेत्राचा सखोल अभ्यास केल्यास स्पर्धेत निभाव लागू शकतो. कला आणि वाणिज्य या शाखांमध्ये करिअरच्या असंख्य संधी आहेत. विज्ञान शाखेकडे जाताना भावी काळात कोणते क्षेत्र निवडायचे आहे हे निश्चित करून काळजीपूर्वक विषयांची निवड करा. वैद्यकीय शाखेत अनेक अभ्यासक्रम आहेत. परिचारिका किंवा परिचर यांना स्थानिक ते आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. संरक्षणशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, भाषाविज्ञान, संशोधन अशा क्षेत्रांमध्ये उत्तम करिअर करता येते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रवेशपरीक्षांचा कसून सराव करावा!” व्याख्यानानंतर वेलणकर यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंकानिरसन केले. संजय दातार यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र बाबर यांनी आभार मानले. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ आणि राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.