निगडी, दि. ६ (पीसीबी) – फिजिओथेरपिस्ट असलेल्या महिलेने यमुनानगर निगडी मधील एका रुग्णालयात राडा घालून डॉक्टरवर खुनी हल्ला केला. त्यानंतर आकुर्डी प्राधिकरणातील एका जिममध्ये जाऊन एका महिलेवर देखील खुनी हल्ला केला. निगडी पोलिसांनी फिजिओथेरपिस्ट असलेल्या डॉक्टर महिलेला अटक केली आहे. तसेच या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटना गुरुवारी (दि. 4) रात्री साडेआठ आणि नऊ वाजता घडल्या.
पहिल्या प्रकरणात डॉ. राजीव अजित नगरकर (वय 51, रा. यमुनानगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिजिओथेरपिस्ट डॉक्टर महिला (वय 29, रा. कोंढवा, पुणे. मूळ रा. भोपाळ, मध्य प्रदेश) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नगरकर यांचा यमुनानगर येथ दवाखाना आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजता आरोपी महिला दवाखान्यात आली. दवाखान्याच्या कौन्सिलिंग रूममध्ये येऊन टेबलावरील काचेचा ग्लास, मोबाईल, लॅपटॉप, काचेच्या फ्रेमची महिलेने तोडफोड केली. माझ्या पतीला फोन करा नाहीतर मी आत्महत्या करेन. तुम्ही पोलिसांना बोलावले तर मी आत्महत्या करेन, अशी तिने नगरकर यांना धमकी देत त्याच्या हाताला चावा घेतला. नगरकर दवाखान्याच्या बाहेर आले असता महिलेने, माझ्या पतीला बोलवा, मी स्वतःला का मारू. मी फक्त तुम्हाला मारणार, अशी धमकी देऊन नगरकर यांच्या अंगावर काचेचा तुकडा घेऊन मारण्यासाठी आली. काचेच्या तुकड्याने वार करून नगरकर यांना महिलेने जखमी केले.
त्यानंतर आरोपी महिला आकुर्डी प्राधिकरण येथील बीच बॉडीज या जिममध्ये रात्री नऊ वाजता गेली. जिममध्ये एक महिला आणि जिमचे मालक साहित्याची आवराआवर करून घरी निघत होते. जिममध्ये येऊन आरोपी महिलेने, मी तुम्हाला ठार मारेन, अशी धमकी देत जिममधील महिलेला डंबेल फेकून मारला. त्या महिलेला वाचवताना जिमचे मालक मयुरेश केशव मोरे यांच्या हाताला मुक्कामात लागला आहे. आरोपी महिलेने काचेच्या तुकड्याने सर्वांना भीती दाखवून दहशत निर्माण केली. याबाबत जिममधील महिलेने खुनाच्या प्रयत्नाची फिर्याद दिली आहे.











































