महापालिका अधिकाऱ्यांच्या वाहन इंधन खर्चाकरीता ‘प्रीपेड पेट्रो कार्ड’ सुविधा बंधनकारक

0
277

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विविध विभाग आणि अधिकारी यांच्या वाहन इंधन खर्चाकरीता सुरु करण्यात आलेली ‘प्रीपेड पेट्रो कार्ड’ सुविधा बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्याबाबत सर्व विभागांसाठी सूचना देण्यात आलेली आहे. त्यासंदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी स्वतंत्र परिपत्रक काढले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि संगणकीय प्रणालीचा वापर करून प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी तसेच आर्थिक व्यवहार रोख विरहीत (कॅशलेस) होण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने मनपा विविध विभाग व अधिकारी यांना शासकीय कामकाजासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांमध्ये इंधन भरण्याकरीता होणारा आर्थिक व्यवहार सुलभ व कॅशलेस होण्यासाठी बँक ऑफ बडोदा मार्फत प्रीपेड पेट्रो कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 वाहनात इंधन भरण्यासाठी प्रिपेड पेट्रो कार्डचा वापर अनेक विभागांनी सुरु केला आहे. तथापि, काही विभागांकडून अद्यापही प्रीपेड पेट्रो कार्डचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले असून सर्वच विभागांना इंधन भरण्यासाठी प्रीपेड पेट्रो कार्ड वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच इंधनासाठी पेट्रो कार्डद्वारे खर्च करण्यात आलेले देयके तातडीने लेखा विभागाकडे सादर करण्याबाबतच्या सूचनाही सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.

ज्या विभागांनी अद्यापही बँकेकडून प्रीपेड पेट्रो कार्ड घेतले नाही, अशा विभागांची देयके लेखा विभागाकडे स्वीकारली जाणार नाहीत. त्यामुळे संबंधित विभागांनी तात्काळ पेट्रो कार्ड घेऊन त्याचा वापर सुरु करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.