पोलिसांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा मारण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड मध्ये सुरू

0
823

 

  • मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली तत्काळ दखल, पोलिसांची तंतरली

पिंपरी,दि. ५ (पीसीबी) – स्मार्ट सिटी, आयटी सिटी, मेट्रो सिटी म्हणून पिंपरी चिंचवड शहर नावारूपाला येत आहे. येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले असून जमिनीचे खरेदी, विक्री व्यवहार जोरात सुरू आहेत. यामध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा बेकायदेशीरपणे जमिनीचा ताबा घेण्याचे प्रमाण पिंपरी चिंचवड मध्ये वाढत आहेत. असाच एक प्रकार ताथवडे येथील (सर्वे नंबर १६१ चा चार आणि पाच क्षेत्र ७० आर) आसवानी असोसिएट्सचे भागीदार श्रीचंद आसवानी यांच्या बाबत वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत होत असल्याची माहिती श्रीचंद आसवानी प्रसिद्धीस दिली आहे. दरम्यान, या प्रकऱणाची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने घेतली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना श्रीचंद आसवानी यांनी सांगितले की, आसवानी असोसिएटच्या नावे ताथवडे येथील सर्वे नंबर १६१ मधील ४ आणि ५ मध्ये ७० आर जागा ओव्हाळ कुटुंबीयांकडून आम्ही २८/२/२००८ रोजी दस्त नोंदणी क्रमांक १०१२/२/२००८ च्या सूची क्रमांक २ नुसार रितसर खरेदी केली आहे. त्यानंतर आम्ही आमच्या खर्चाने त्याजागेवर वॉल कंपाऊंड केले, एक वॉचमन खोली उभारली, तेथे एमएसइबीचे कनेक्शन घेतले आहे. या सर्व बाबींच्या व्यवहाराच्या व पावत्या आमच्याकडे आहेत. याच सर्वे नंबर मध्ये १६१ चा २ ब ही १० आर जमीन संजय लक्ष्मण आगेलू यांनी १९९१ मध्ये खरेदी केली होती. संजय आगेलु यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ज्योती संजय आगेलू यांनी ही दहा आर जमीन विक्रीस काढली. यानंतर किरण प्रकाश बुचडे यांनी ही जागा खरेदी केली. किरण बुचडे यांनी जागा खरेदी करणेपूर्वी भूमी अभिलेख कार्यालय पौड ( मुळशी) येथे चतु सीमा निश्चित करणे कामी अर्ज केला होता.

या अर्जास आम्ही आसवानी असोसिएटचे भागीदार या नात्याने दि. ३१ मार्च २०२२ रोजी हरकत घेतली होती. संबंधित कार्यालयाने आमच्या अनुपस्थितीत २८ एप्रिल २०२२ रोजी बेकायदेशीरपणे सुनावणी करून ३० एप्रिल २०२२ रोजी किरण बुचडे यांना प्रत दिली. याबाबत आम्ही मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी शहर, पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड शहर, पोलीस निरीक्षक वाकड पोलीस स्टेशन यांच्याकडे रितसर तक्रार अर्ज दिला आहे. याविषयी आम्ही वाकड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यास गेलो असता पोलिस अधिकारी सहकार्य करीत नाहीत.

उलट बेकायदेशिररित्या किरण बुचडे आणि त्यांचे सहकारी त्यांची जमीन सोडून आमच्या जमिनीचा ताबा घेत असताना त्यांना मदत करीत आहेत. या बाबत आम्हाला रितसर न्याय अपेक्षित असताना पोलिसांनी अश्या पद्धतीने काम करणे लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही. याबाबत आसवानी असोसिएटच्या वतीने आम्ही भागीदार पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालया समोर आंदोलन करणार आहोत असे पत्र श्रीचंद आसवानी यांनी केले आहे.दरम्यान, या प्रकरणाची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली असल्याचे आसवानी यांनी माध्यमांना सांगितले.