स्वाभिमानी सुराज्य निर्माण करण्यासाठी समताधिष्ठीत महाराष्ट्राची जडणघडण करावी

0
247

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कृतीशील भूमिका बजावली. महाराष्ट्राची अस्मिता वृद्धिंगत करून स्वाभिमानी सुराज्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी समताधिष्ठीत महाराष्ट्राची जडणघडण करावी. त्यातूनच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिप्रेत असलेला समतावादी संयुक्त महाराष्ट्र उभा राहील, असा सूर विचार प्रबोधन पर्वाच्या परिसंवादात उमटला.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व 2022” निमित्त पाच दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात “संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊंचे योगदान” या विषयावरील परिसंवाद पार पडला. यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अभ्यासक डॉ. उज्वला हातागळे, काशिनाथ आल्हाट, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी सहभाग नोंदविला.

प्रा. डॉ. उज्वला हातागळे म्हणाल्या, अण्णा भाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे लेखक होते. त्यांनी कामगारांना न्याय मिळवून देताना कशाचीही तमा बाळगली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना सहभागी होण्यासाठी उद्युक्त केले. तसेच कोणत्याही चळवळीत जातीवंत कलाकारांचा सहभाग असेल तर ती चळवळ तळागाळापर्यंत पोहचते आणि व्यापक स्वरूप धारण करते, असे विचार त्यांनी मांडले. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन ठरले. एकजुटीने कार्य केल्यास चळवळ यशस्वी होते. तसेच रडण्यापेक्षा लढण्यावर अण्णा भाऊंचा विश्वास होता, हे अण्णा भाऊंनी आपल्या कृतीतून दाखून दिले, असे मत भाऊसाहेब अडागळे यांनी व्यक्त केले.

अन्यायाविरुद्ध लढा देणारे कामगारांचे नेते, कोलमडलेल्या व्यवस्थेला दिशा देणारे कलावंत, मातीशी एकनिष्ठ राहून नेतृत्व करणारे राजकारणी, उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या व्यथा आपल्या लेखणीद्वारे परखडपणे मांडणारे साहित्यिक अशी बहुआयामी भूमिका लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या जीवनात बजावली. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान मोठे आहे. अण्णा भाऊ साठे यांनी ज्यांच्यासाठी विद्रोह केला, त्यांची स्वाभिमानाची भावना सतत जागृत राहणे तसेच अण्णा भाऊंचे कार्य यापुढेही सुरु ठेवणे गरजेचे असल्याचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड म्हणाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कामगार शेतकरी यांना सहभागी करून घेण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांनी महत्वाची भूमिका बजावली तसेच चळवळी सोबतचे त्यांनी कायम नाते जपले. कामगार, शोषित, वंचितांच्या न्याय हक्कासाठी अण्णा भाऊंनी लढा उभारला, असे संदीपान झोंबाडे यांनी सांगितले. सूत्रसंचालन सुनिल भिसे यांनी केले.

दरम्यान, विचार प्रबोधन पर्वाच्या दुस-या दिवशी विविध प्रबोधनात्मक, सांस्कृतिक कार्यकम पार पडले. यामध्ये पल्लवी घोडे यांचा “संगीत संध्या”, धनंजय खुडे यांचा “लोकशाहीरांना मुजरा”, लखन अडागळे यांचा “पठ्ठा लहुजींचा”, राजू जाधव यांच्या “मेरा भारत महान” हा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रम यांनी सादर केला. सूर नवा, ध्यास नवा फेम ख्यातनाम गायिका राधा खुडे यांच्या अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रबोधनपर गीतांच्या कार्यक्रमाने दुसऱ्या दिवसाची सांगता झाली.