संजय राऊत यांनी प्रवीण राऊतांकडून तीन कोटी रुपये रोख घेतल्याचा ईडी चा नवा खुलासा

0
471

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : पत्राचाळ जमीन घोटाळ्यात शिवसेनेचे संजय राऊत ईडीच्या तावडीत आहेत. अशात त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचाही आरोप आहे. दरम्यान, एक हजार कोटींहून अधिक रूपयांच्या या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या ईडीने नवा खुलासा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईत टाकलेल्या छाप्यांनंतर संजय राऊत यांनी मुख्य आरोपी प्रवीण राऊतांकडून तीन कोटी रुपये रोख घेतल्याचं समोर आलं आहे.

तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच पैशांतून संजय राऊत यांनी अलिबाग परिसरात नऊ भूखंड खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राऊत यांनी भूखंड खरेदीसाठी रोख रक्कम भरल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने सोमवारी रात्री उशिरा राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर आता एक-एक नवे खुलासे समोर येत आहेत.

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी शहरातील दोन परिसरांची झडती घेतली. यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १० भूखंड खरेदी करून ३ कोटी रुपये रोख भरल्याचा आरोप आहे. यावरून ईडी सध्या एचडीआयएल आणि प्रवीण राऊत यांच्याकडून मिळालेल्या रोख रक्कमेची चौकशी करत आहे.

HDIL च्या माजी अकाउंटंटची चौकशी…
ईडीने शोधलेल्या दोन जागांपैकी एक अशा व्यक्तीचा होता जो पूर्वी एचडीआयएलशी संबंधित होता आणि त्याचे रोख व्यवहार हाताळत होता. या प्रकरणी ईडीने त्यांचे जबाब नोंदवले आहेत. प्रवीण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांना मिळालेल्या रोख रकमेची ईडी चौकशी करत आहे. प्रवीण हा एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शनच्या संचालकांपैकी एक होता. संजय राऊत यांना HDIL कडून रोख रक्कम देण्याच्या सूचना मिळाल्या होत्या का? याचाही ईडी तपास करत आहे.