पिंपरी दि. २ (पीसीबी)- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा उपक्रमाची पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर सध्या “हर घर तिरंगा”याविषयी हॅलोटोन वाजत आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे. देशात “आजादी का अमृत महोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दि.11 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “हर घर तिरंगा” हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. यासाठी महापालिका तब्बल तीन लाख राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिले जात आहेत.
शहरातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फटकला जावा, यासाठी महापालिका विविध पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. याचाच भाग म्हणून महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोबाईलची “हर घर तिरंगा” अशी हॅलोटोन करण्यात आली आहे. यामाध्यमातून “हर घर तिरंगा” उपक्रमाची जनजागृती करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.