भाजपा नेत्यांवर ईडी कारवाई झाल्याचे दाखवा, लाख रुपये मिळवा

0
245

औरंगाबाद, दि. २ (पीसीबी) – केंद्रामध्ये आणि आता राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या पाठींब्याने सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीविरोधात विरोधकांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे आरोप केले जातात. भाजपाकडून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) माध्यमातून अडकविण्याचा डाव सुरू आहे असे आरोप शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा विरोधकांकडून केले जात आहे. राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापलेलं असतानाच आता औरंगाबादमध्ये भाजपाविरोधात झळकावण्यात आलेलं पोस्टर अनेकांचे लक्ष वेधून घेत असून ते शहरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी शहरातील क्रांती चौकात हे भाजपाविरोधी पोस्टर लावलं आहे. “या देशात ऐतिहासिक बहुमताने भाजपाचं सरकार सत्तेत आलेलं आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांचं सरकार आहे. एवढ्यावरही त्यांची भूक भागत नसल्याने ते सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहेत,” अशी टीका अक्षय पाटील यांनी केली आहे. “आज या देशात ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणाचे प्रमुख भाजपाच्या घरगड्यांप्रमाणे वागत आहेत. ईडी ही भाजपाची दुसरी शाखाच झालीय,” असा टोलाही पाटील यांनी लगाला आहे. शहरातील काही प्रमुख चौकांमध्ये आणि मुख्य ठिकाणी पाटील यांनी हे बॅनर्स लावलेले आहेत.