महापालिका रुग्णालयात वाढीव दर लागू

0
431

पिंपरी, दि. १ (पीसीबी) –  विविध सामाजिक संघटनांचा विरोध डावलून महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये  आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराकरीता शासन दराप्रमाणे आज (सोमवार) पासून आकारणी सुरु केली. नवीन दरामुळे उपचार महागले आहेत.

महापालिकेचे  8 रुग्णालये आणि 29 दवाखान्यांमधून शहरातील तसेच शहराच्या हद्दीबाहेरील रुग्णांना उपचारार्थ आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या जातात. पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्य असल्याचा पुरावा सादर न करणा-या  रुग्णांकडून प्रत्येक वैद्यकीय शिर्षातील आंतररुग्ण बिलामध्ये महापालिकेमार्फत 20 टक्के जादा फी आकारली जात होती.  तसेच ओपीडी रुग्णांच्या बाबतीत वास्तव्याचा पुरावा आवश्यक नसतो, असे महापालिकेचे पूर्वीचे धोरण होते. नव्या धोरणातही त्याप्रमाणेच कार्यवाही केली जाणार आहे. शासन दरानुसार निर्धारीत केलेले दर महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांकरिता आजपासून लागू  केले आहेत.

शासनाकडील नियमानुसार सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ( उदा. गरोदर माता तपासणी, प्रसुती सेवा व प्रसुती नंतर मातेस, बालकास 30 दिवस सेवा, सिजरीयन सेवा, लहान मुलांचे लसीकरण, संदर्भ सेवा, गरोदर माता सोनोग्राफी व रक्त तपासणी, कोविड व इतर) आणि राज्य शासनाच्या योजनेप्रमाणे तसेच दारिद्रयरेषेखालील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना मोफत वैद्यकीय उपचार सुविधा पुर्वीप्रमाणेच असतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व पिवळ्या व केशरी शिधापत्रिका कार्डधारक रुग्णास मोफत सुविधा दिली जाणार आहे. परंतु, जे रुग्ण केशरी शिधापत्रिकाधारक आहेत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बसत नाहीत, अशा रुग्णांना शासनाकडील दरांनुसार दर आकारणी केली जाणार आहे.

असे आहेत नवीन दर!
नवीन केसपेपर फी पूर्वी 10 रुपये होते. आता 7 दिवसांसाठी 20 रुपये, जुना केस पेपर फी पूर्वी 10 रुपये होती. आता 20 रुपये, औषधांकरीता 5 दिवसांसाठी 10 रुपये होते. आता एक रुपयाही नसणार आहे. आंतररुग्ण शुल्क 30 रुपये कायम ठेवले. बेड जार्चेस – जनरल वार्डसाठी पूर्वीप्रमाणेच दिवसाला 30 रुपये ठेवले. अतिदक्षता विभाग (आसीयू) पूर्वी प्रतिदिन 170 रुपये होते. आता प्रतिदिन 400 रुपये, साईड रुमसाठी प्रतिदिन 90 रुपये होते. आता प्रतिदिन 150 रुपये असणार आहेत.

सेमी प्रायव्हेटसाठी पूर्वी प्रतिदिन 90 रुपये होते. आता 300 रुपये असणार आहेत. ड्रेसिंगसाठी पूर्वी 10 रुपये चार्जेस होते. आता 20 रुपये असणार, प्लास्टर फी पूर्वी 90 रुपये होती, आता 55 रुपये असणार आहे. एक्स-रे साईजनुसार – 8×10 साठी पूर्वी 40 होते, आता 30 रुपये, 10×12 साठी पूर्वी 40 होते, आता 50 रुपये, 14×14 साठी पूर्वी 40 होते, आता 50 रुपये तर 14×17च्या एक्स-रेसाठी पूर्वी 40 होते, आता 125 रुपये फीस असणार आहे. सोनोग्राफी – एॅबडोमेन, पेल्विससाठी पूर्वी 90 रुपये होते. आता 120 रुपये शुल्क आकारणार आणि एॅबडोमेन आणि पेल्विससाठी पूर्वी 170 रुपये होते. आता 120 रुपये शुल्क आकारणार आहे. तर, रुग्णवाहिकेसाठी पूर्वी प्रती 15 किलो मीटरपर्यंत 110 रुपये, त्यानंतर प्रती किलोमीटर करिता 10 रुपये शुल्क होते. आता प्रति किलो मीटरसाठी 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. प्रतीक्षा शुल्क पूर्वी प्रती तास 30 रुपये होते. आता 8 तासांच्या पुढे प्रतीक्षा शुल्क प्रतीतास 100 रुपये असणार आहे.