औरंगाबाद, दि. ३० (पीसीबी) : अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे गटात सामील व्हावेत, यासाठी अब्दुल सत्तार यांनी प्रयत्न केले. अर्जुन खोतकर यांनी आज शिंदे गटात सहभागी होण्याची घोषणा केली. आता आणखी 2 ते 4 खासदार आणि 7 ते 8 आमदार आमच्यासोबत येणार आहेत, असा गौप्यस्फोट अब्दुल सत्तार यांनी केला. त्यामुळं राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता कोणते खासदार आणि कोणते आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होतील, याची चर्चा सुरू झाली आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, ईडीचा विषय मोठा नाही. अर्जुन खोतकर यांनी घोटाळा केलेला नाही. फक्त कागदांची अनियमितता आहे. त्यामुळे ईडीचे काम ईडी करेल. त्यात काही मोठा विषय नाही.
रामनगर कारखाना सुरू होईल, अशी अपेक्षा अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारखान्याला मदत करतील. अर्जुन खोतकर यांना खारीचा वाटा आम्ही नक्कीच देऊ, असंही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं. जालना लोकसभा ही भाजपची आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांना विधानसभा की, विधानपरिषद काय द्यायचं हे ठरवू. माझ्या टोपीचा मुक्काम पोस्ट आता वाढला आहे, अशी मिश्किल्लीही त्यांनी केली.
अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की, आम्हाला खुश करण्यासाठी हा दौरा नाही. एकनाथ शिंदे अनेक ठिकाणी जात आहेत. त्यामुळे या टीकेला महत्व नाही. लोक चर्चा करतात. चर्चेला खर्च येत नाही. त्यामुळे लोक बोलत असतात. शिवसेना कुणाची असली कुणाची नकली हे 8 तारखेला ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवाय आणखी 2 ते 4 खासदार आणि 7 ते 8 आमदार आमच्यासोबत येणार आहेत, असं म्हटलं. यामुळं राजकीय विश्लेषकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
इम्तियाज जलील यांना राजकारणाचे दुकान चालवण्यासाठी हे करावं लागतं. पण जलील यांनी काळे झेंडे दाखवण्याऐवजी विकासाचे काम करून घ्या, असा सल्ला अब्दुल सत्तार यांनी दिला. अब्दुल सत्तार यांनी अर्जुन खोतकर हे शिंदे गटात प्रवेश करतील, असं सांगितलं. त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात जात असल्याची घोषणा केली. आता आणखी काही खासदार आणि आमदार शिंदे गटात येणार असल्याचं सांगितलं. त्यामुळं मूळ शिवसेनेत किती खासदार आणि आमदार राहतात, हे पाहावं लागेल.