राज्यपालांच्या वक्तव्याशी भाजपा सहमत नाही – फडणवीस

0
282

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं योगदान खूप मोठं आहे. राज्यपालांनाही याची जाणीव असावी. मात्र एखाद्या विशेष कार्यक्रमात आपण अतिशयोक्ती अलंकार वापरतो, त्या स्थितीतून राज्यपालांचं वक्तव्य आलं असावं. याबद्दल ते स्वतः स्पष्टीकरण देतील, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. काल एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी माणसांचं योगदान काढून घेतलं तर काहीच उरणार नाही. मुंबईत तेवढा पैसा उरणार नाही, असं वक्तव्य केलं. याविरोधात सर्वच राजकीय पक्षांकडून तसेच सामान्य मराठी माणसांकडून तीव्र टीका केली जातेय.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज्यपालांच्या वक्तव्याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ राज्यपालांच्या विधानाशी मी सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं कार्य सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रातही मराठी माणसाने प्रगती केलीय ती जगात मराठी माणसाचं नाव आहे. विविध समाजांचं योगदान नाकारता येणार नाही. यात गुजराती, मारवाडी समाजही असेल. पण महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणूस, उद्योजक, साहित्यिक आदींचा सहभाग जास्त आहे. एकूणच या बाबीला बघितलं तर एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अतिशयोक्ती अलंकार वापरला जातो. तशाचप्रकारे मा. राज्यपाल बोलले आहेत. विश्वास आहे की, त्यांच्याही मनात मराठी माणसाबद्दल श्रद्धा आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग मोठा आहे…