शिवसेना सोडताना अर्जून खोतकरांना अश्रू अनावर..

0
405

जालना, दि. ३० (पीसीबी) – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी आज आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे “उद्धव ठाकरेंशी बोलून एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे”, असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. जालना येथे पत्रकारपरिषदेत त्यांनी आज आपली भूमिका जाहीर केली. दरम्यान, खोतकर यांच्या ठाकरे आणि शिवसेनेबद्दलची आस्था स्पष्ट दिसत होती तसेच ४० वर्षांतील आठवणी दाटून आल्याने त्यांना गहिवरुन आले.

यावेळी अर्जुन खोतकर म्हणाले, “मी जालन्यात माझी भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करेन, असं सांगितलं होतं. त्यानुसार आज मी आपल्याशी बोलत आहे. मी १९९० मध्ये शिवसेनेच्यावतीने पहिल्यांदा आमदार झालो आणि आजपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे, पक्षाची सेवा करत आलो आहे. यामध्ये मी एकटाच नाही तर आमचे सर्व सहकारी आणि सगळ्यांनी मिळून जिल्ह्यात शिवसेनचं संघटन वाढवलं आणि ते सामान्य माणासापर्यंत आम्ही ते घेऊन गेलो. सामान्य माणसाने देखील तेवढाच विश्वास आमच्यावर टाकला. अनेक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आमच्या पदरात लोकांनी यश टाकलं त्याबद्दल मी जालना जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. पक्षनेतृत्वाचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की, त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आणि ती जबाबदारी मी समर्थपणे सांभाळू शकलो.”