‘या’ देशात बनवण्यात येत आहे जगातील पहिले व्हर्टिकल शहर

0
480

विदेश,दि.२९(पीसीबी) – सौदी अरेबिया जगातील पहिले व्हर्टिकल शहर बनवणार आहे. या प्रकल्पाला ‘द लाइन’ असे नाव देण्यात आले आहे. हे वन बिल्डिंग शहर असेल. त्याची रुंदी 200 मीटर (656 फूट) असेल, तर त्याची लांबी 170 किलोमीटर असेल. इतकेच नाही तर ते समुद्रसपाटीपासून 500 मीटर (1,640 फीट ) उंच असेल.

वन बिल्डिंग सिटी ही काचेची असेल. म्हणजेच शहराच्या बाहेरील भिंती काचेच्या असतील. आपण आतापर्यंत हॉलिवूडच्या सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये पाहिल्याप्रमाणेच त्याचे स्वरूप असेल. विशेष म्हणजे हे शहर पूर्णपणे रिन्यूएबल ऊर्जेवर चालणार आहे. म्हणजे, या शहरात वीज सौरऊर्जा, बायोमास आणि हायड्रो पॉवरपासून निर्माण केली जाईल.

सौदी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा प्रकल्प भविष्यातील शहर तयार करण्याचा आहे. रिन्यूएबल ऊर्जेच्या मदतीने प्रदूषण टाळता येऊ शकेल.

शहरात मुलांसाठी शाळा-महाविद्यालये, मनोरंजनासाठी उद्याने आणि ऑफिस असतील. इथे घरेही फ्लॅटप्रमाणे बांधले जातील.

या शहरात गाड्या नसतील, परंतु हायस्पीड रेल्वेची सुविधा उपलब्ध असेल. येथे राहणाऱ्या लोकांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी फक्त 20 मिनिटे लागतील.

ते तयार करण्यासाठी सुमारे 500 अब्ज डॉलर्स म्हणजेच 39.98 लाख कोटी रुपये लागतील. येथे सुमारे 90 लाख लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.