– शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पाहणी
– सुमारे 14 लाख शेतक-यांना मिळणार लाभ
पिंपरी, दि. २८ (पीसीबी)– राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतक-याचं नुकसान झालं आहे. त्या शेतक-यांच्या बांधावर जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी दौरा केला. त्या शेतक-यांना तात्काळ भरपाई मिळावी म्हणून 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत आज घेतला. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 14 लाख शेतक-यांना लाभ मिळणार आहे. हे सरकार शेतक-यांच्या कल्याणसाठी काम करीत असून त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी दिली.
पवार यांनी दिलेल्या पत्रकांत म्हटले आहे की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांना कधीही न्याय दिला नाही. महापूर, अतिवृष्टीत शेतक-यांच्या पंचनामे करण्यात वेळ घालविला. त्यांना वेळेवर कधीच मदत दिली नाही. शेतक-यांच्या वीज पंपाचे कनेक्शन तोडून त्यांची उभी पिके करपून घालविण्याचे महापाप तिघाडी सरकारने केले होते. शेतकरी आत्महत्या होवूनही त्याकडे दुर्लक्ष केले. सरसकट सातबारा कोरा करु म्हणा-या महाविकास आघाडीने शेतक-यांना फसवी कर्जमाफी जाहीर करुन प्रत्यक्षात किती शेतक-यांना त्याचा लाभ मिळाला हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे महाभकास तिघाडी सरकारने शेतक-यांवर सतत अन्यायच केला. त्यांच्या प्रश्नाला कधी न्याय मिळालाच नाही.
मात्र, राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत शेतक-यांना प्रोत्साहनपर लाभ जाहीर केला आहे. 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी 6 हजार कोटी निधी दिला आहे.या योजनेत 2019 मध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचा लाभ दिला आहे. मयत शेतक-यांच्या वारसांना देखील कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसाला सुद्धा हा लाभ दिला आहे.
तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 हा कालावधी विचारात घेऊन दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे.
दरम्यान, राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकार ख-या अर्थाने शेतक-यांच्या बांधावर जावून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्या कल्याणासाठी हिताचे निर्णय घेवू लागले आहे. या निर्णयाने शेतक-यांना चांगला लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांना वीज दरात सवलत..
राज्यातील कृषी पंप शेतकरी ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना जून 2021 पासून 1 रुपया 16 पैसे प्रति युनिट, स्थिर आकारामध्ये 25 रुपये प्रति केव्हीए इतकी सवलत कायम दिली आहे. लघुदाब उपसा जलसिंचन ग्राहकांना 1 रुपया प्रति युनिट हा सवलतीचा दर आणि स्थिर आकारामध्ये 15 रुपये प्रति महिना सवलत जून 2021 पासून नव्याने देण्यात येईल. यामुळे सरकारला महावितरण कंपनीस 7 कोटी 40 लाख रुपये शासन देणार आहे.










































