नागरिकांनो, पाणी उकळून, गाळून प्या; महापालिकेचे आवाहन

0
333

पिंपरी दि. २७ (पीसीबी) – पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पवना नदीत सध्यस्थितीत गढूळ पाणी येत असून नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन महापालिका पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.

मावळातील पवना धरणातून पवना नदीत पाणी सोडले जाते. महापालिका रावेत येथील बंधाऱ्यातून पाणी उचलते. ते पाणी प्राधिकरणातील जलशुध्दीकरण केंद्रातून शुध्द करून शहरातील विविध भागातील टाक्‍यामध्ये वितरित केले जाते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे धरणातून पाणी न सोडता नदीतील पाणी महापालिका उचलते.

धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. तसेच पवना नदीत येणाऱ्या पाण्यात गढूळपणा वाढला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने पाणी शुध्द केले जात आहे. हे पाणी पिण्यासाठी पुर्णपणे योग्य आहे. त्यानंतरही नागरिकांनी पाणी वापरण्यापूर्वी उकळून आणि गाळून घ्यावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले.