श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था, लक्ष्मीबाई महिला प्रतिष्ठाणतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0
656

पिंपरी, दि. २६ (पीसीबी )- थेरगावातील श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था, लक्ष्मीबाई महिला प्रतिष्ठाण आणि युवा अधिकारी विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (राणी येसूबाई) स्वराज्य रक्षक संभाजी फेम आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते 500 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आलाचिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नुकताच हा कार्यक्रम झाला. युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे, बाळासाहेब वाल्हेकर, विलास जगदाळे, बाळासाहेब वाघमोडे, लहु नवले, दिलीप बोंबले पाटील, हनुमंत माळी, माजी नगरसेविका विमल जगताप, दिपाली गुजर, धनाजी बारणे, नंदू जाधव, रुपेश कदम यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या, ”कष्टाशिवाय फळ मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अभ्यासच केला पाहिजे. विद्यार्थ्यांनो जेवढे कष्ट कराल तेवढे चांगले फळ मिळेल. दहावी, बारावी झाल्यानंतर सायन्स, कॉमर्स की कला शाखा निवडाची आहे. ते अगोदर ठरवावे. कोणतीही शाखा निवडल्यानंतर त्यादिशेने वाटचाल करावी. प्रचंड कष्ट केल्यास नक्कीच यश मिळेल. मी कष्टाच्या जोरावरच तुमच्यासमोर उभी आहे. अभिनय क्षेत्रात असूनही मी शिक्षणाचा खंड पडू दिला नाही. अभिनय करता-करता माझे शिक्षण सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सातत्याने शिकत रहावे”.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”आत्ताचे विद्यार्थी खूप हुशार आहेत. विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळतात. त्यामुळे दहावी, बारावीनंतरही विद्यार्थ्यांनी अभ्यासातील चिकाटी कायम ठेवावी. त्या अभ्यासाच्या जोरावर उच्चशिक्षित व्हावे. शिक्षणानंतर चांगली नोकरी मिळेल मात्र नोकरी मिळाल्यानंतर आई-वडिलांना विसरु नये. त्यांच्या कष्टामुळेच शिक्षण झाल्याची जाण ठेवावी, असा मोलाचा सल्ला खासदार बारणे यांनी विद्यार्थ्यांना दिला”.

युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगीतले की आपल्याला ज्या क्षेत्राची आवड त्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा . आत्ताच आपल्या आवडणाऱ्या क्षेत्रात प्रवेश घेतला तर त्यांचा फायदा हा भविष्यकाळामध्ये होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी सायन्स, कॉमर्स व आर्ट शाखेस प्रवेश घेतल्यास त्या क्षेत्रात हि चागला वाव आहे.आय.टी क्षेत्रात व बाहेरील देशांमध्ये नोकरी मिळत आहे. आपल्या पुणे शहरात चेन्नई, कोलकत्ता, गुजरान व इतर बाहेरील देशांमधील कंपन्या देखील स्थापन होत आहेत. त्याचा फायदा हा आपल्याला होईल. असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे उपाध्यक्ष दिलीप बोंबले-पाटील यांनी केले. सूत्रसंचालन बी.के. कोकाटे यांनी केले. तर, आभार हनुमंत माळी यांनी मानले.