संतांनी आपल्या कृतीतून जगाला मानवतावाद दिला – रुपाली चाकणकर

0
280

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भजनस्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – संत परंपरा आणि महाराष्ट्राचे अतुट नाते आहे. आपल्या समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संतांचा मोठा वाटा आहे. या संतांनी आपल्या कृतीतून जगाला मानवतावाद दिला, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगाव येथे माजी नगरसेविका माया बारणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य भजन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी चाकणकर बोलत होत्या. यावेळी झालेल्या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते अभय मांढरे, माजी नगरसेवक संतोष बारणे,सतीश बारणे, संगीता कोकणे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी हभप शेखर महाराज जांभूळकर, सुखलाल महाराज बुचडे, आबा गव्हाणे यांच्या हस्ते भजन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल 90 भजनी मंडळांनी सहभाग नोंदविला. प्रस्ताविकपर बोलताना माया बारणे म्हणाल्या, शहराच्या विकासात अजितदादांचे मोठे योगदान आहे. शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवितानाच त्यांनी शहराचा अतिशय वेगाने विकास केल्यामुळे पिंपरी-चिंचवड हे राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक वेगाने विकसीत होणारे शहर ठरले आहे.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचे शिल्पकार हे खर्‍या अर्थाने अजितदादाच आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शहराचा विकास वेगाने झाला. आपल्या शहरात देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेले नागरिक राहत आहेत. अजितदादांचे शहराला नेतृत्त मिळाल्याने आणि त्यांनी केलेल्या विकासामुळे आज शहरातील नागरिकांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळत आहेत. खर्‍या अर्थाने उद्योगनगरी, कामगारनगरी आणि विकसीत शहर हे नाव अजितदादांच्या दुरदृष्टीच्या नेतृत्वामुळेच मिळाले आहे. ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूल, दर्जेदार रस्ते, उद्याने यासारख्या सुविधा दादांच्या नेतृत्त्वाखाली निर्माण झाल्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडल्याचेही गव्हाणे यावेळी म्हणाले.

विजेत्या भजनी मंडळांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वाटप करण्यात आले. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांक श्वास अभंग, विश्व अभंग, बुरूंजवाडी, ज्ञानदेव भजनी मंडळ, भोसरी, माऊली बाल मंडळ, चिखली यांनी पटकाविला. तर द्वितीय क्रमांक स्वरानंद भजनी मंडळ, मारुंजी, संतसंग भजनी मंडळ, रहाटणी, संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ, रोटेवाडी, मावळ यांनी पटकाविला. तिसरा क्रमांक ताजुबाई भजनी मंडळ, ताजे, मावळ, श्री. संत सावतामाळी भजनी मंडळ, वाकड, स्वरपुजा भजनी मंडळ, थेरगाव यांनी पटकाविला.

विशेष गायनाबद्दल रामकृष्ण हरी भजनी मंडळ, सांगवी व भैरवनाथ भजनी मंडळ, चर्‍होली यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गणेश टाके यांचा पखवाद वादक, सुजीत लोहार यांचा तबला वादक तर हार्मोनियम वादनाबाबत हनुमान भजनी मंडळ, चाकण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.