बंडखोर आमदार भुमरेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंसाठी प्रचंड गर्दी

0
243

औरंगाबाद, दि. २३ (पीसीबी): गेल्या दोन दिवसांपासून शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी औरंगाबादमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील बिडकीन येथे आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला. यावेळी बिडकीन परिसरात शिवसैनिकांमध्ये कमालीचे चैतन्य संचारल्याचे दिसले. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेतील ही सर्वात मोठी गर्दी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे हे शुक्रवारी सकाळी नाशिकमध्ये होते. त्यानंतर संध्याकाळी ते औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले होते. औरंगाबादेत येताना वैजापूर, खुलताबाद परिसरात आदित्य ठाकरे यांचे अशाचप्रकारे मोठे स्वागत झाले होते. तेव्हादेखील प्रचंड गर्दी होती. त्यानंतर औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेला सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांवर टीकेचे आसूड ओढले होते. यानंतर आज आदित्य ठाकरे पैठण, नेवासा, शिर्डी असा प्रवास करणार आहेत. आज त्यांच्या मराठवाड्यातील शिवसंवाद यात्रेचा समारोप होणार आहे. त्यापूर्वी पैठण मतदारासंघातील बिडकीन येथे आदित्य ठाकरे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.

आदित्य ठाकरे यांच्या बिडकीनमधील रोड शो वेळी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी होती. त्यांना पाहण्यासाठी इमारतीच्या गच्चीवरही लोक जमले होते. एकूण आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसला. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड चैतन्य संचारले होते. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला आणि भाषणांना मिळणारा प्रतिसाद असाच वाढत राहिला तर शिंदे गटासाठी ही नक्कीच चिंतेची बाब ठरू शकते. गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेतील अनेक पदाधिकारी शिंदे गटाला जाऊन मिळत आहेत. मात्र, आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेला पुन्हा उभारी देणार का आणि पक्षाला लागलेली गळती थांबवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.