म्हाळसाकांत महाविद्यालयात प्लास्टिकमुक्त शालेय परिसर अभियानाला सूरूवात

0
377

आकुर्डी, दि. २३ (पीसीबी) – : प्रत्येक शाळा, महाविद्यालयांनी प्लास्टिक मुक्त परिसर हा उपक्रम राबवून शहर स्वच्छतेची भावना बाळगावी. तसेच, विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गापासून ते दहावी वर्गापर्यंत प्लास्टिक मुक्ती संदर्भात प्लास्टिक मुळे होणारे परिणामांचे धडे देवून स्वच्छ परिसर व प्लास्टीक मुक्तीची चळवळ उभारावी, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि पुणे शिक्षण मंडळाचे श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी यांच्या वतीने “प्लास्टिकमुक्त शालेय परिसर अभियान” या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी, महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील लाडके, उपप्राचार्य खुशालदास गायकर, उपमुख्याध्यापक सुधीरकुमार रोकडे, पर्यवेक्षिका सिंधू मोरे, स्मार्ट सिटीच्या कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, जनसंपर्क अधिकारी सोयम अस्वार, अभिजीत पाठक यासह महाविद्यालयाचे शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते.

ढोल ताशाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. तत्पूर्वी, शालेय परिसरात प्लास्टिक वापरावर बंदी या धोरणाला अनुसरून प्लास्टिक मुक्त शालेय परिसर अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. श्री म्हाळसाकांत विद्यालय ते श्री विठ्ठल मंदिर या मार्गावर प्रबोधनपर फलक, संगीत साहित्यासह पदयात्रा काढण्यात आली. तसेच, प्लास्टिक मुक्तीची शपथ देखील घेण्यात आली. अभियानातंर्गत दुकानदारांकरिता स्वाक्षरी अभियान राबवून प्रबोधन करण्यात आले. निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

प्लास्टिकमुळे पृथ्वीवरील जनजीवन धोक्यात आले आहे. प्लास्टिकला आळा घालण्यासाठी महाविद्यालय, शाळांमधून विद्यार्थ्यांना त्याबाबतचे धडे देणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या वतीने शहरभरात प्लास्टिक मुक्ती, पर्यावरण जनजागृती बाबत मोहीम राबविली जात आहे. नागरिकांना स्वच्छतेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मोहिमेत हजाराच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. श्री म्हाळसाकांत महाविद्यालयाने घेतलेले स्वच्छतेचे पाऊल इतर शाळा, संस्थांना प्रेरणादायी ठरणार आहे, महापालिकेने स्वच्छतेसाठी उभारलेल्या चळवळीत सहभागी होऊन स्वच्छेतेसाठी घेतलेला पुढाकार ही एक कौतुकाची बाब असल्याचे विकास ढाकणे यांनी यावेळी सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य लाडके यांनी केले. महाविद्यालयाद्वारे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देत संस्थेच्या इतर शाळांमध्येही असे उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

शिक्षक अशोक आवारी, कर्डीले, किरण लवटे, जस्टीन मॅथीव्ह, विवेक पाटील, आशिष चिकणे, श्रेया जगताप, युवराज देहदुंडे, प्रेम मुजुममुळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन शिक्षीका माधुरी पवार यांनी केले.