– राष्ट्रवादी झोपडपट्टी सेल अध्यक्ष संतोष निसर्गंध यांचा इशारा
पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – बालाजीनगर येथील विस्कळीत झालेला विजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करणार, असल्याचा इशारा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष संतोष शेषराव निसर्गंध यांनी दिला आहे.
भोसरी येथील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांनी एक सविस्तर निवेदन निसर्गंध यांनी आज दिले. आपल्या निवेदनात ते म्हणतात, गेल्या दोन महिन्यांपासून बालाजी नगर पॉवर हाऊस या भागातील विज पुरवठा विस्कळीत झाला आहे, त्यामुळे,येथील नागरिकांना, महिलांना, शालेय विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. सकाळी ४ वाजल्यापासून विजेचा पुरवठा बंद केला जातो, त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी , कामावर जाणारे कामगार व महिला यांना या समस्येचा दररोज सामना करावा लागत आहे. आपल्या कार्यालयाकडून जाणीवपूर्वक बालाजीनगर हा झोपडपट्टीचा भाग असल्यामुळे विज पुरवठा खंडीत केला जात असल्याची सर्व झोपडपट्टी मध्ये चर्चा आहे.
बालाजीनगरचा विजपुरठा सुरळीत करावा या मागणीचे अनेक निवेदने आपणांस देण्यात आलेली आहेत, परंतु आपणाकडून कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. दोन दिवसाच्या आत बालाजीनगर येथील विजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आपल्या भोसरी येथील मुख्य कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी, असा इशारा संतोष निसर्गंध यांनी दिला आहे. आंदोलनामुळे होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी आपली राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे












































