महापालिका निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिध्द; 84 हजार मतदारांच्या प्रभागात बदल

0
268

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी निवडणूक विभागाने गुरुवारी (दि.21) रात्री उशिरा प्रसिद्ध केली आहे. 84 हजार मतदारांच्या प्रभागात बदल करण्यात आला आहे. त्याची टक्केवारी 5.50 टक्के आहे.

महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक शाखेने प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी 23 जून रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार एकूण 15 लाख 693 मतदार होते. त्यापैकी 12 हजार 564 वगळलेले म्हणजे स्थालांतरित किंवा मयत झालेले मतदार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीला 14 लाख 88 हजार 129 मतदारांची संख्या आहे. त्यात पुरुष 8 लाख 394, महिला 6 लाख 87 हजार 647 आणि इतर 88 मतदार आहेत.

प्रारूप मतदार यादीवर आलेल्या सुमारे साडे आठ हजारांवर हरकतींच्या अनुषंगाने सुमारे 84000 हजार मतदारांच्या प्रभागांमध्ये बदल करण्यात आला आहे. आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, नगर रचना सहसंचालक प्रशांत शिंपी, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड तसेच 160 प्रगणक, 70 पर्यवेक्षक, 35 नियंत्रित अधिकारी, 450 बीएलओ या कामकाजासाठी महिनाभर काम करत होते. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थळ पाहणी, पंचनामे पूर्ण करून अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.