अबब! शहरात तब्बल 1 हजार 110 खड्डे

0
270

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल 1 हजार 110 खड्डे आहेत. त्यापैकी 846 खड्डे बुजविल्याचा दावाही केला आहे.

शहरातील प्रत्येक भागातील रस्त्यांवर खड्डे आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर महापालिकेच्या स्थापत्य विभागाने शहरातील रस्त्यांची पाहणी केली. या पाहणीत एक जून 2022 पूर्वी शहरात 265 खड्डे असल्याचे आढळून आले. तर, 1 जून 2022 पासून 19 जुलै पर्यत शहरात नव्याने 845 खड्डे आढळून आले. असे ऐन पावसाळ्यात शहरात एकूण 1 हजार 110 खड्डे असल्याचे समोर आले. शहरातील प्रत्येक भागातील रस्त्यांवर हे खड्डे पहायाला मिळाले. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत खड्ड्यांची मोठी संख्या होती.

शहरातील सर्वाधिक म्हणजेच 265 खड्डे ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रस्त्यांवर आढळून आले आहेत. पुनावळे, पिंपळे निलख, शिवार गार्डन, क्रांतीनगर आदी परिसरात हे खड्डे होते. त्या पाठोपाठ फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 175,  ग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 153, ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 140, क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 107, अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 99, ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 89 तर, ह क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 82 खड्डे आढळून आले.

याबाबत बोलताना शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, ”शहरातील सर्व रस्त्यांची पाहणी केली. त्यात 1 हजार 110 खड्डे आढळून आले. तातडीने हे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. शहरातील बहुतांश खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित खड्डे बुजवण्याचे काम वेगात सुरू आहे”.