जेष्ठ नागरिकांच्या सवलती संदर्भात भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय…

0
324

नवी दिल्ली,दि.२२(पीसीबी) – रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यावधी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे. रेल्वेने प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावर कोणतीही सूट मिळणार नाही. त्यांना पूर्ण पैसे भरूनच प्रवास करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावर सूट देण्यात येत होती. मात्र कोरोना काळात तिकीटावरील ही सूट बंद करण्यात आली. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी ज्येष्ठ नागरिकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. आत्तापर्यंत सुरू असलेल्या पद्धतीप्रमाणेच त्यांना प्रवासासाठी तिकीटाची पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. संसदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे नमूद केले. तसेच ट्रेनने प्रवास करणाऱ्या खेळाडूंनाही तिकीटावर कोणतीही सूट मिळणार नसल्याचे, त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी कोणताही दिलासा मिळणार नाही.

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाड्यात देण्यात येणारी सूट, यासंदर्भात बोलताना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, सरकार अजूनही रेल्वे भाड्याचा 50 टक्के खर्च उचलत आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावर जी सूट देण्यात येत होती, त्यामुळे सरकारला 2019-2020 साली 1667 कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागला होता. तर 2018-2019 साली सरकारने 1636 कोटी रुपयांचा बोजा सहन केला.

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी लोकसभेत या प्रश्नाचे उत्तर दिले. प्रवाशांना तिकीटाच्या रकमेवर सूट देणे खूप भारी पडते, ज्यामुळे रेल्वेला मोठे नुकसान सहन करावे लागत. कोरोनापूर्वी रेल्वेची जी कमाई होत होती, त्यापेक्षा आता कमाई खूप कमी झाली आहे. रेल्वे प्रवाशांना जी सूट देण्यात येते, त्यामुळे रेल्वेच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होत असल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावर सूट देणे बंद केले होते. त्यामुळे 2020 साली रेल्वेला 1500 कोटी रुपयांचा अधिक महसूल मिळाला. 20 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 पर्यंत 7.31 कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला, त्यांना प्रवासभाड्यात कोणतीही सूट मिळाली नव्हती.