तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आशा भोसले गेल्या राज ठाकरेंंच्या भेटीला

0
290

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी भेट घेतली. आशा भोसलेंनी राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या दादरमधील निवासस्थानी जाऊ त्यांची भेट घेतली. नुकतीच राज यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रीया झाल्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आशा भोसले या थेट राज ठाकरेंच्या घरी पोहचल्या.

राज आणि आशा भोसले यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीदरम्यानचा एका फोटो समोर आला असून यामध्ये राज यांच्या एका हातात वॉकिंग स्टीक असून त्यांच्या बाजूला आशा भोसले उभ्या आहेत. राज यांनी आशा भोसलेंच्या खांद्यावर हात ठेवला असून त्यांनीही दोन्ही हातांनी राज यांचा हात पकडल्याचं दिसत आहे. दोघेही कॅमेराकडे पाहून हसताना दिसत आहेत. शस्त्रक्रीयेनंतर राज यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून राज यांची विचारपूस करण्यासाठी आशा भोसले त्यांच्या घरी गेल्या होत्या. राज आणि मंगेशकर कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध आहे.

राज ठाकरे मागील काही काळापासून हीप बोन या आजाराने त्रस्त होते. पुण्यातील एका सभेतून त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. अखेर २० जून रोजी लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पाच दिवसांनी म्हणजेच २५ जून रोजी राज घरी परतले. यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्वीटरवरुन दिली होती. “आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थिरतरित्या पार पडली! काही वेळापूर्वीच रुग्णालयामधून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम असो!” असे राज ठाकरेंनी म्हटले होते.