कोरोना काळात धंदा बुडाल्याने व्यापाऱ्याने कारमध्येच घेतले पेटवून

0
205

नागपूर,दि. २० (पीसीबी) – कोरोना काळात व्यवसायामध्ये मोठे नुकसान झाल्यामुळे नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात एका व्यावसायिक व्यक्तीने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, या व्यापाऱ्याने स्वत:च्या पत्नी आणि मुलाला देखील जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यातून बचावले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामराज भट असं मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. आर्थिक अडचणीतून त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. रामराज पत्नी संगीता आणि मुलगा नंदनसोबत भट खापरी पुनर्वसन परिसरात कारने गेले होते. त्या दरम्यान भट यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.कारमध्येच भट यांनी मुलगा आणि पत्नीसह पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण पत्नी आणि मुलगा यात भाजले. त्याामुळे दोघेही बचावले. मात्र, रामराज भट हे आगीच्या भक्षस्थानी सापडले. पत्नी आणि मुलगा आगीत जखमी झाले असून त्यांच्यावर खापरी येथील स्वामी विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरू आहे.

रामराज भट यांचे नट-बोल्ट उत्पादनाचे काम होते. वेगवेगळ्या कंपन्यांना ते माल पुरवठा करायचे. कोरोना काळात लॉकडाऊन लागला त्यामुळे सर्व उद्योग-धंदे बंद पडले होते. त्यामुळे भट यांना व्यवसायामध्ये प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानामुळे भट हे आर्थिक संकटात सापडल होते. भट यांचा मुलगा नंदन हा इंजिनियर होता. त्यामुळे त्यांनी मुलाला काम करून घराला हातभार लावण्याचे सांगितले. मात्र, नंदन काही काम करण्यास तयार नव्हता. त्यामुळे भट यांच्यापुढे पुन्हा मोठे संकट सापडले.