सहजता ,प्रसन्नता, रसिकता यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच शांताबाई शेळके यांची कविता

0
423

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – सहजता ,प्रसन्नता, रसिकता यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांची कविता आहे. आत्मविष्कार प्रधान सत्वशील कविता हे त्यांचे काव्यविशेष असल्यामुळे युगानुयुगे रसिकमनावर त्यांची काव्यमोहिनी राहणार आहे ,असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री व लेखिका माधुरी विधाटे यांनी केले. स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव व कवयित्री शांताबाई शेळके जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त स्वानंद महिला संस्था व श्री आनंद मंगल साहित्य परिषद, बिजलीनगर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.शांताबाई शेळके यांच्या सुमधुर गीतांचा समावेश असलेला एक जीवनप्रवास रेखाटून त्यांनी शांताबाईंना काव्यसुमनांजली वाहिली.

कंचनमाला बाफना यांच्या स्वागतगीताने तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रास्ताविक स्वानंदच्या अध्यक्षा व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुरेखा कटारिया यांनी केले. ज्येष्ठ कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या सविता इंगळे ,ज्येष्ठ कवयित्री सरला मुनोत ,शोभा बंब ,शोभा शिंगवी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचा परिचय सुजाता नवले यांनी करून दिला.

स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांमुळे आज आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. ज्याप्रमाणे या शहीदांनी बलिदान दिले त्याचप्रमाणे त्यांच्या वीरपत्नींचे या स्वातंत्र्यसंग्रामात खूप मोठे योगदान आहे.या स्वातंत्र्यसंग्रामात कित्येक महिला अहिंसक पध्दतीने लढल्या. त्या भूमीगत झालेल्या सैनिकांना अन्नपाणी,औषधे पुरवत होत्या. काही महिला सशस्त्र लढल्या म्हणून आज देश स्वतंत्र झाला. या पंच्याहत्तर वर्षांत भारताने विविधक्षेत्रात क्रांती केली आहे. आणि आज घडीला अख्ख्या जगाला कवेत घेण्याची ताकद आपल्या राष्ट्राकडे आहे. अशी भूमिका ज्येष्ठ कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या सविता इंगळे यांनी मांडली.

डॉ.श्वेता राठोड यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षातील स्त्री मनाची वेगवेगळी भूमिका स्पष्ट केली व प्रत्येक स्त्रीने नकारात्मकता , न्यूनगंड व नैराश्यावर मात करून स्वाभिमानाने व आत्मविश्वासाने स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले पाहिजे असे प्रतिपादन केले.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिलेल्या कस्तुरबा गांधी, उषा मेहता, मृणाल गोरे, सरोजिनी नायडू, अरुणा असफल्ली, इंदिरा गांधी ,गोदावरी परुळेकर या आणि अशा अनेक स्वातंत्र्यसेनानी महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सरला मुनोत यांनी शांताबाईंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.
याप्रसंगी पुष्पा संचेती,लता बाविस्कर, अनिता नहार, कल्पना बंब ,नेहा बोरा, सविता भंडारी ,साधना सवाने यांनी शांताबाईंच्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता लुनावत यांनी केले.आभार लीना कटारिया यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन सपना जैन ,शकुंतला ओसवाल,लीना शहा, कुमुद ओसवाल यांनी केले.