जनसंवादच्या धर्तीवर “करसंवाद”; करसंकलन विभागाचा उपक्रम

0
343

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – करदात्यांचे विविध प्रश्‍न, त्यांना करासंदर्भात येणाऱ्या अडचणी, मनातील शंकांची सोडवणूक करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी जनसंवाद सभेच्या धर्तीवर “करसंवाद”चे आयोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार कर आकारणी व करसंकलन विभागाचे विभागप्रमुख सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिन्यातील चौथ्या शनिवारी सकाळी 11 वाजता हा करसंवाद ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या महिन्याच्या 23 तारखेला या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. या संवादासाठी स्मार्ट सारथी ॲप टीमचे सहकार्य घेण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 77 हजार मिळकतींची नोंदणी आहे. या सर्व मिळकतींना महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत कर गोळा केला जातो. मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधांसह 16 विभागीय कार्यालयात कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. करदात्यांना घर बसल्या जास्तीत-जास्त सेवा-सुविधा कशाप्रकारे उपलब्ध होतील, यासाठी आयुक्त राजेश पाटील आग्रही असून कर संकलन विभागप्रमुख सहाय्यक आयुक्त देशमुख त्याबाबतीत विशेष प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने आता करसंवाद हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

करदात्यांचे विविध प्रश्‍न, त्यांना मालमत्ता करासंदर्भात येणाऱ्या अडचणी, मनातील शंका, कर कशाप्रकारे लावला, चुकीची कर आकारणी केली आहे, मालमत्ता हस्तांतरण अशा विविध प्रश्‍नांची सोडवणूक या करसंवादच्या माध्यमातून सोडविण्याचा कर संकलन विभागाचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक महिन्यातील चौथ्या शनिवारी सकाळी 11 वाजता फेसबुक, ट्विटर, युट्युब या माध्यमातून ऑनलाइन पध्दतीने हा करसंवाद होणार आहे. यावेळी करदात्यांना आपले प्रश्‍न विचारता येतील. या प्रश्‍नांची कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त देशमुख यांच्यासह सर्व मंडलाधिकारी, प्रशासन अधिकारी “ऑन दी स्पॉट” प्रश्‍न सोडविणार आहेत.

ज्या नागरिकांना करसंवादला ऑनलाइन सहभागी होता येणार नाही, अशा नागरिकांचे कर आकारणी संदर्भात जे काही प्रश्‍न असतील त्यांनी महापालिकेच्या तळमजल्यावरील कर आकारणी व कर संकलन विभागाच्या कार्यालयात महिन्यातील चौथ्या शनिवारी सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे. यावेळी सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख, सर्व मंडलाधिकारी, प्रशासन अधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्‍नांचा जागेवरच निपटारा होण्यास मदत होणार आहे.