अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात शिवसेना जवळपास झिरो

0
346

– खासदार, श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, जिल्हा प्रमुख शरद सोनवणेंचा जय महाराष्ट्र

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) : शरद पवार, अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे उरलेसुरले नेते, जिल्हाप्रमुखसुध्दा एकनाथ शिंदे गटात सामिल होत असल्याने संघटनेची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. एकमेव खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा प्रमुख शरद सोनवणे तसेच पुणे महापालिकेतील काही नगरसेवक यांनी आता उघडपणे शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने शिवसेना जवळपास झिरो व्हायची वेळ आली आहे.

शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील एका पंचताराकिंत हॉटेलात आपल्या समर्थक आमदारांची काल (ता.१८) बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेच्या लोकसभेतील १९पैकी १२ खासदारांनीही दुरदृश्य प्रणालीव्दारे (ऑनलाईन) उपस्थिती लावून शिंदेंना समर्थन दिले. त्यात पुणे जिल्ह्यातील मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश होता. शिरूरचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी,तर या बैठकीला उपस्थित राहून शिंदेंना जाहीर पाठिंबा दिला. आजी,माजी खासदारच शिंदे गोटात गेल्याने पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा सुरुंग लागला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात आता शिवसेना जवळपास झिरो व्हायची वेळ आली आहे.

दरम्यान, शिंदे गटाला समर्थन केलेल्यांची शिवसेनेतून हकापट्टी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करीत आहेत. मात्र,ती करायच्या आधीच पुणे जिल्हाप्रमुख आणि जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी काल (ता.१८) रात्री उशीरा आपल्या पदाचा राजीनामा देऊन ठाकरेंवरच कुरघोडी केली.पक्षालाच जोरदार धक्का दिला.आढळऱाव यांनी काल सायंकाळी शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांचे समर्थक सोनवणेंनी,तर लगेच राजीनाम्याचे हत्यार उपसले.

दरम्यान,पुणे जिल्ह्यातील आढळराव समर्थक पदाधिकारी,कार्यकर्तेही सामूहिक राजीनामे देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.त्यासाठी त्यांची बैठक सकाळी दहा वाजता आढळराव यांच्या लांडेवाडी (ता.मंचर,जि.पुणे) येथील निवासस्थानी होत आहे.त्यातून उत्तर पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे.

राष्ट्रवादीचा प्रचार करण्यास सांगितल्याचे न पटल्याने शिंदे गोटात गेल्याचे आढळराव यांनी कालच सांगितले होते. त्याच कारणातून त्यांचे समर्थक आ.सोनवणे यांनीही तो दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत तडजोड करून राष्ट्रवादीशी काम करावे लागेल, असे ५ जुलै रोजी त्यांनाच नाही,तर आढळरावांनाही सांगण्यात आले होते. स्थानिक पातळीवर हे मनोमिलन शक्य नसल्याचे सांगत त्यातूनच राजीनामा दिला असल्याचे सोनवणे म्हणाले. काल रात्री उशीरा तो त्यांनी ठाकरे यांच्याकड़े पाठवून दिला. महाविकास आघाडीमुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसैनिक खचत नाही,तर संपत चालला होता,असे त्यात त्यांनी म्हटले आहे.

इच्छा नसताना आपल्यापासून दूर होत आहे. तसेच आपल्यावर नाही,तर आपण घेतलेल्या निर्णयावर नाराज असल्याचेही त्यांनी पुढे त्यात नमूद केले आहे. साहेब, आपले वरचे राजकारण वेगळे आहे, पण खाली तळागाळातील कार्यकर्त्याचे,मात्र ते नेहमीच संघर्षाचे राहिलेले आहे,या शब्दांत त्यांनी ठाकरे यांना राजीनाम्यातून सुनावण्यासही कमी केलेले नाही.