सर्द आवाजासाठी ओळखले जाणारे भूपेंद्र सिंग कालावश

0
300

मुंबई, दि. १९ (पीसीबी) :सोमवारी रात्री मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग यांचे मुंबईत निधन झाले. त्यांची पत्नी आणि गायिका मिताली सिंग यांनी महान गायकाच्या निधनाची माहिती दिली. भूपिंदर सिंग हे त्यांच्या सर्द आवाजासाठी ओळखले जातात. अनेक बॉलिवूड गाण्यांना त्यांनी आवाज दिला. सोमवारी संध्याकाळी गायक यांच्या निधनाबद्दल माहिती देताना त्यांची पत्नी मिताली म्हणाल्या की, “ते काही दिवसांपासून अनेक आरोग्य समस्यांनी त्रस्त होते”.

वयाच्या 82 व्या वर्षी गायकाने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, संगीत दिग्दर्शक उत्तम सिंह यांनी सांगितले की, भूपिंदर यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11.30 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. भूपिंदर सिंग हे बॉलिवूडमधील त्यांच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांसाठी ओळखले जातात. “मौसम”, “सत्ते पे सत्ता”, “आहिस्ता आहिस्ता”, “दूरियाँ”, “हकीकत” आणि इतर अनेक चित्रपटांतील गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला.

त्यांच्या काही प्रसिद्ध गाण्यांबद्दल सांगायचे तर, “होके मजबूर मुझे, उसके बुला होगा”, “दिल ढूंढता है”, “दुकी पे दुकी हो या सत्ता पे सत्ता” सारखी गाणी आजही लोकांच्या तोंडी आहेत.भूपिंदर सिंग प्रसिद्ध भारतीय संगीतकार आणि मुख्यतः गझल गायक. लहानपणी ते् वडिलांकडून गिटार वाजवायला शिकले. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी गायक आणि गिटार वादक म्हणून काम केले. 1964 मध्ये संगीतकार मदन मोहन यांनी त्यांना स्वतःचे म्हणून घेतले.

पहिला मोठा ब्रेक
भूपेंद्र सिंह यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. त्यांचे वडील प्रोफेसर नाथा सिंग हे देखील उत्तम संगीतकार होते. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या गुलजार यांनी लिहिलेल्या ‘वो जो शहर था’ या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळाली. भूपेंद्र यांनी 1980 मध्ये बंगाली गायिका मिताली मुखर्जीसोबत लग्न केले. मात्र, दोघांना मूलबाळ नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.