शिवसेनेला मोठा धक्का, रामदास कदम यांचाही `जय महाराष्ट्र`

0
225

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : महाराष्ट्रातील सत्ता गमावलेल्या शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम यांनी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राजीनामा पाठवला आहे. याआधी कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते.

रामदास कदम हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेही राहिले आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री करण्यात आले होते. रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम दापोलीतून आमदार आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या गुवाहाटीला पोहोचलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये योगेश यांचा समावेश होता.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह ते सुरतला गेले. त्यानंतर तेथून गुवाहाटी येथे पोहोचले. शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले. यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० आमदार आहेत. यामध्ये शिवसेनेच्या ४० आमदार आणि १० अपक्ष आमदारांचा समावेश आहे.

शिवसेनेत फूट सुरूच
शिवसेनेत पक्ष सोडणाऱ्या नेत्यांचे दौर सुरूच आहे. यापूर्वी ५५ पैकी ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले. यानंतर ठाणे, नवी मुंबईसह अनेक पालिकांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नुकतेच शिवसेना युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला.