पवित्र श्री क्षेत्र भीमाशंकर खेड- आंबेगाव- जुन्नर तालुक्यांना एकत्रितपणे राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात यश

0
445

भीमाशंकर, दि. १८ (पीसीबी) – केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी कार्यक्रमांतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघातील १) खेड-चास-वाडा-तळेघर-श्री क्षेत्र भीमाशंकर यासह २)बनकर फाटा- जुन्नर- घोडेगाव- तळेघर- श्री क्षेत्र भीमाशंकर या दोन प्रमुख रस्त्यांना नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी यांनी नुकताच प्राप्त करून दिला असून याद्वारे तीनही तालुक्यांच्या पर्यटनात व विकासात आगामी काळात भरीव वाढ होणार आहे.

मी खासदार असताना म्हणजे सन २०१५ पासून आंबेगाव, जुन्नर व खेड हे तीनही तालुके केंद्र शासनाच्या भारतमाला परीयोजनेअंतर्गत एकत्रितपणे श्री क्षेत्र भीमाशंकर या पवित्र ज्योतिर्लिंग देवस्थानला जोडण्यात यावे व त्याद्वारे पर्यटनाची अन विकासाची कवाडे खुली करण्यात यावी यासाठी सातत्याने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे प्रयत्नशील होतो. याबाबत व्यक्तिशः केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी यांचीही अनेकदा भेट घेतली होती. त्यांनी देखील हा प्रस्ताव सकारात्मक पद्धतीने स्वीकारत सर्व तांत्रिक व आवश्यक बाबी पूर्ण करून आपण लवकरात लवकर या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून देऊ अशी ग्वाही मला दिली होती. आज या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने मला अतिशय आनंद होत असून या महामार्गामुळे आंबेगाव, जुन्नर व खेड या तीनही तालुक्यांच्या पर्यटनात लक्षवेधी वाढ होणार आहे. विशेषतः आदिवासी भागातील नागरिकांच्या जीवनमानात महत्त्वपूर्ण बदल घडून येण्यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

या भागातील नैसर्गिक साधन संपत्ती व जैवविविधता तसेच पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणे मोठ्या प्रमाणात असल्याने यासह श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांची संख्याही फार मोठी असल्याने पर्यटकांसाठी या महामार्गाचा भविष्यात खूप मोठा उपयोग होणार असून त्यातून या भागाचा विकासात व दळणवळणात लक्षणीय भर पडणार आहे. मी खासदार म्हणून काम करत असताना या मतदारसंघाच्या हिताकरिता जे काही मोठे प्रकल्प राबवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू होते त्यातील प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून हा महामार्ग एक होता. आता या महामार्गाला मंजूरी मिळाल्याने यावर सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करणे केंद्र शासनाला विशेषतः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणास शक्य होणार आहे. या महत्वपूर्ण मंजुरीबद्दल बद्दल मी केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या नवीन महामार्गाच्या निर्मितीचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे यासाठी मी मा.श्री. नितीनजी गडकरी यांच्याकडे प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करणार आहे.