शौचालयाचा खड्डा खोदताना सापडले घबाड

0
335

लखनऊ, दि. १८ (पीसीबी) – उत्तर प्रदेशमधील जौनपूरच्या मछली शहरमध्ये शौचालयासाठी खड्डा खोदताना ब्रिटीशकालीन सोन्याची नाणी मिळाल्याची घटना समोर आली आहे. नाणी सापडताच खड्डा खोदणाऱ्या कामगारांमध्ये नाणी घेण्यावरुन वाद निर्माण झाला होता. ही सर्व नाणी ब्रिटिश राजवट १८८९-१९१२ काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ही नाणी जप्त केली असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे. यातील काही कामगार फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मच्छलीशहर शहरातील कजियाना परिसरातील नूरजहाँ पत्नी इमाम अली राईन यांच्या घरात शौचालय बांधण्यासाठी खड्डा खोदण्यात येत होता. या दरम्यान कामगारांना खोदकामादरम्यान तांब्याच्या भांड्यात काही ब्रिटीशकालीन सोन्याची नाणी सापडली. या नाण्यांवरून कामगारांमध्ये वाद सुरु झाला. अखेर मजूरांनी खड्डा खोदण्याचे काम अर्धवट सोडले आणि दुसऱ्या दिवशी येऊन आणखी नाण्यांच्या लोभापाई पुन्हा खड्डा खोदण्यास सुरुवात केली. या कामगारांपैकी एकाने राईन यांच्या मुलाला सोन्याची नाणी मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे राईन याच्या मुलानेसुद्धा कामगारांकडे नाणे मागण्यस सुरुवात केली. अखेर कामगारांनी त्यालासुद्धा एक नाणे दिले.