पिंपरी, दि.१७ (पीसीबी) – रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या अध्यक्षपदी कल्याणी कुलकर्णी तर सचिवपदी आनंदिता मुखर्जी यांची निवड करण्यात आली. दोघींनी शनिवारी (दि.16) आकुर्डीत झालेल्या शानदार कार्यक्रमात पदभार स्वीकारला.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण समारंभ झाला. हेमा परमार, प्रकाश जेठवा, माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख, मावळते अध्यक्ष गौरव शर्मा, माजी सचिव रामेश्वर लाहोटी, श्रीकृष्ण करकरे, अलका करकरे आदी यावेळी उपस्थित होते. गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
डॉ. अनिल परमार म्हणाले, “रोटरी क्लबचे जगात 35 हजारहून अधिक क्लब आहेत. या बॅचमध्ये 25 टक्के महिला अध्यक्षा आहेत. आकुर्डी रोटरी क्लबच्या अध्यक्षा,
सचिव दोन्ही महिला आहेत. याचा विशेष आनंद आहे. दोघीही नक्कीच चांगले काम करतील, असा मला विश्वास आहे. आकुर्डी रोटरी क्लबकडून रक्तदान शिबिर, सुकन्या योजना, मुलींसाठी चांगले उपक्रम राबविले जात आहेत. क्लबच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरू केले आहेत. ते नक्कीच मार्गी लागतील. त्याचा लोकांना फायदा होईल”.
पदग्रहणानंतर कल्याणी कुलकर्णी म्हणाल्या, “अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी आहे. त्याचे भान ठेवून मी वाटचाल करणार आहे. चांगले वक्ते आणून मार्गदर्शन ठेवणार आहे. सर्व रोटरिअन यांच्याशी उत्तम संपर्क ठेवणार आहे. दहा नवीन सभासद वाढविणार आहे. महिलांच्या आरोग्याबाबत अधिक काम करण्यावर भर राहील. त्यादृष्टीने वाटचाल करणार आहे. सभासदांच्या वाढदिवसादिवशी ते राहत असलेल्या गृहनिर्माण सोसायटीत जात रक्तदान शिबिर घेऊन रोटरी क्लबचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचविणार आहे. पुढील आठवड्यात चार शाळांमध्ये हिमोग्लोबिन चाचणी शिबिर घेणार आहे. ग्रामीण भागातील मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी सायकल देण्याचा माझा मानस आहे. शाळांमध्ये वाटर पेरिफाय, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था केली जाणार आहे. या उपक्रमांना सर्वांचे सहकार्य मिळेल, अशी मला आशा आहे”. मावळते अध्यक्ष गौरव शर्मा यांनी मागील वर्षेभरात केलेल्या कामाची माहिती दिली.
क्लबच्या नवीन कार्यकारिणीत गौरव शर्मा (आयपीपी), रामेश्वर लाहोटी (क्लब प्रशासन संचालक), प्रवीण आगरवाल (खजिनदार), जिग्नेश आगरवाल (फाउंडेशन संचालक), शशिकांत शर्मा (सदस्यता संचालक), उदय जामखेडकर (वैद्यकीय प्रकल्प संचालक), गौतम शहा (सेवा प्रकल्प संचालक), जसविंदर सिंग शोकी (कम्युनिटी सेवा संचालक), सीमा शर्मा (जनसंपर्क संचालक), उमंग सलीगा ( युथ सेवा संचालक), गणेश जामगावकर (सीएसआर संचालक), विजय तारक (ग्लोबल ग्रँट संचालक), नेहा नायकुडे (आयटी संचालक) आणि संतोष आगरवाल (क्लब ट्रेनर) यांचा समावेश आहे.












































