जगदीप धनखड यांना भाजपकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी घोषित

0
316

कोलकाता, दि. १७ (पीसीबी) : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना भाजपकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीनंतर या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. जगदीप धनखड हे एनडीए आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

उपराष्ट्रपतीपदासाठी माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, सुरेश प्रभू, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान अशी काही नाव चर्चेत होती. मात्र भाजपकडून धनखड यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जुलै असून ६ ऑगस्टला मतदान होणार आहे. २०१७ मध्ये भाजपने तत्कालीन केंद्रीय मंत्री वैकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली होती.संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपचे संख्याबळ असल्याने धनखड यांचे पारडे जड मानले जात आहे. दरम्यान आता धनखड उपराष्ट्रपती गेल्यास पश्चिम बंगालचे नवे राज्यपाल कोण असणार असा सवाल विचारला जात आहे. या नावासाठी माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची चर्चा सुरु झाली आहे.

नक्वी हे मागील वेळी झारखंडमधून राज्यसभेवर गेले होते. या दरम्यान त्यांची राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशामध्ये पार पडलेल्या २ लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांपैकी एका जागेवर उतरवले जाण्याची शक्यता होती. पण ही शक्यता फोल ठरली. पुढे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून त्यांना संधी मिळू शकते अशीही चर्चा झाली होती.