उध्दव ठाकरे – एकनाथ शिंदे येणार एकत्र ?

0
246

– भाजपाच्या पुढाकाराने वाद मिटणार असल्याचे दीपाली सय्यद यांच्या ट्वीटने खळबळ

मुंबई, दि. १७ (पीसीबी) : शिवसेनापक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार असल्याबाबतचे टि्वट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केलं आहे. या टि्वटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. “येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार?” असं टि्वट करुन दिपाली सय्यद यांनी खळबळ उडवून दिली आहे.

“येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्थीकरीता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल,” असे सय्यद यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

या टि्वटसोबत त्यांनी आणखी एक टि्वट केलं आहे.
“लवकरच आदित्य ठाकरे मंत्रीमंडळात दिसावेत, शिवसेनेच्या 50 आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील, असं दिपाली सय्यद यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
दिपाली सय्यद यांनी यापूर्वीही टि्वट करीत ठाकरे-शिंदे यांच्या भेटीसाठी भाजने मध्यस्थी करावी,अशी विनंती केली होती. “उद्धवसाहेबांनी आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमीच उघडे ठेवले असून एकनाथ शिंदे यांच्यावतीने प्रवक्ते आणि आमदारांनी उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे. ही सर्व घटना शिवसेनेचा भाजपावर असलेल्या हिंदुत्वाच्या विश्वासामुळे घडली असून भाजपाने मोठ्या मनाने मध्यस्थी करावी,” असं सय्यद म्हणाल्या होत्या.