चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील जिजाऊ पर्यटन केंद्रातील मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. पर्यटनाच्या देखभालीकडे प्रशासन, ठेकेदाराचे दुर्लक्ष आहे. उद्यानात सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याची मागणी करुनही सुरक्षा रक्षक वाढविले जात नसल्याचा आरोप माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी केला.
माजी नगरसेविका चिंचवडे म्हणाल्या, श्री मोरया गोसावी मंदिरा लगत जिजाऊ पर्यटन केंद्र विकसित करण्यात आले आहे. श्री मोरया सृष्टी, जिजाऊ सुष्टी, क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारक, क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ क्रांतिस्फूर्ती ज्योत उभारण्यात आलेली आहे. महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, चिल्ड्रन झोन, जॉगिंग ट्रॅक, सुसज्ज ओपन, जीम, जंगलातील दुर्मिळ प्राण्यांच्या प्रतिकृती, स्केटिंग रिंग, ज्येष्ठ नागरिक कक्ष, निसर्ग साहित्य कट्टा, खुली अभ्यासिका, अॅम्पी थिएटर अशा विविध सुविधा असलेले अडीच एकरात केंद्र विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने पर्यटन केंद्रात येतात.
महापालिका, ठेकेदाराकून देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. केंद्रातील दोन मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. कोणी नागरिक कोणी नसताना ही झाडे पडली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. केंद्रातील अनेक साहित्य मोडकळीस आले आहे. स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. देखभालीकडे लक्ष दिले जात नाही. काही दिवसांपूर्वी जिजाऊ पर्यटन केंद्रामधील कृत्रिम प्राण्यांची तोडफोड केली होती. त्यामुळे अधिकच्या सुरक्षरक्षकांची आवश्यकता आहे. सुरक्षा रक्षकांची संख्याही अपुरी आहे. केवळ दोन सुरक्षा रक्षक आहेत. त्यात वाढ करणे आवश्यक आहे. प्रशासनाला सांगूनही सुरक्षा रक्षक वाढविले जात नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशानाने ठेकेदाराला सांगून देखभाल दुरुस्तीची कामे करुन घ्यावीत. देखभालीकडे लक्ष देण्यास सांगावे अशी मागणीही चिंचवडे यांनी केली.