मुंबई, दि. १६ (पीसीबी) – भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेचे 40 आमदार सध्या भाजपकडे आश्रयीत आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्या गटालाच खरी शिवसेना म्हणत आहेत. पण हे प्रकरण अजून न्यायालयात प्रलंबित आहे. कायदेशीर गुंता सोडविण्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय शिवसेना बंडखोर आमदारांना पर्याय नसल्याचे कायदेतज्ञांचे मत आहे.
या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदेंना आता त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्यावाचून गत्यंतर नाही. कारण कायद्याप्रमाणे एखाद्या पक्षातील दोन तृतीअंश आमदार फुटले आणि त्यांनी जर दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्यांना पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही. शिंदे गटाला राज ठाकरे यांच्या पक्षात सामावून घेता येईल का? या चर्चेसाठी फडणवीस ठाकरेंना भेटले असावे अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आली आहे.
राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी ठाकरे आणि फडणवीस भेटीचा मुद्दा उपस्थित केला. एकनाथ शिंदे गटाच्या 40 आमदारांना भाजपमध्ये जायचे नसल्याने त्यांना मनसेमध्ये सामावून घेण्यासंदर्भातील चर्चा ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये झाली का? अशी शंका तपासे यांनी उपस्थित केली. 105 आमदारांचा पक्ष असलेला नेता 1आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला भेटायला गेला असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व प्रश्न फेटाळून लावत, ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने मी त्यांची भेट घेतली. तसे मी यापूर्वी विधीमंडळात जाहीर देखील केले होते. अन्य पक्षातील राजकीय नेत्यांशी संबंध ठेवणे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी ठाकरे यांना भेटल्याने कोणालाही मळमळ होण्याचे कारण नाही, असे फडणवीस म्हणाले.











































