डॉलर घसरला, तुमच्या खिशावर काय परिणाम

0
282

मुंबई, दि. १५ (पीसीबी) : डॉलरच्या तुलनेत रुपयात सुरु असलेली घसरण सुरूच आहे. गुरुवारी एका डॉलरची किंमत वाढून आजवरच्या सर्वाधिक 79.90 रुपये या पातळीवर पोहोचली. रुपयाच्या घसरणीमुळे सर्वच स्तरावर चिंता वाढला आहे. मात्र रिझर्व्ह बँकेकडून रुपयात सुरु असलेली घसरण कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रुपयामध्ये सुरु असलेल्या या घसरणीचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरही होणार आहे.

भारतात अनेक वस्तू या परदेशातून आयात केल्या जातात. यात पेट्रोलियम पदार्थांसह खाद्यतेल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा समावेश आहे. आज तकच्या वृत्तानुसार, रुपयाची घसरण सुरु राहिली आणि डॉलरची किंमत वाढत राहिली तर आयात वस्तूंवर आपल्याला जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहे. म्हणजे आयात वस्तूंवर खर्च वाढल्यास देशात विक्रीसाठी देखील त्या वस्तूंच्या किमती वाढणार आहे. रिफाइंड ऑईल, खाद्यतेल महागण्याची शक्यता –भारत मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करतो. आतंतराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाची खरेदी ही डॉलरमध्ये केली जाते. अशा परिस्थितीत जर रुपया कमजोर झाला तर देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढू शकतात. काही दिवसांपूर्वीच सरकारने खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी आयात शुल्क रद्द केले आहे.

वैद्यकीय खर्च वाढणार –
भारत मोठ्या प्रमाणात औषधांची देखील निर्यात करतो. सोबत औषध निर्मितीसाठीच्या मशिनरीज देखील भारत निर्यात करतो. यासाठी जर जास्तीचे पैसे मोजावे लागले तर याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे आणि वैद्यकीय खर्चासाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

परदेशातील शिक्षण महागणार?
रुपयाच्या घसरणीचा मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होऊ शकतो. भारतातून परदेशात गेलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने मुलांच्या पालकांना जास्त पैसे मुलांना आता पाठवावे लागणार आहेत. तसेच विदेशात फिरायला जाण्याचा कुणी विचार करत असेल आणि एक बजेट ठरवलं असेल तर त्या बजेटपेक्षा नक्कीच खर्च आता वाढणार आहे.